Make Mushrif the Guardian Minister of Kolhapur instead of the inactive Satej Patil
Make Mushrif the Guardian Minister of Kolhapur instead of the inactive Satej Patil  
मुख्य बातम्या मोबाईल

निष्क्रीय सतेज पाटलांऐवजी मुश्रीफांना कोल्हापूरचे पालकमंत्री करा 

निवास चौगले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे रुग्ण 50 पेक्षा कमी होते. ही संख्या आता बारा हजारच्या वर गेली आहे. निष्क्रीय आणि अपयशी पालकमंत्र्यांच्या कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची जनतेची भावना आहे.

म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्याकडून पालकमंत्रिपद काढून घ्यावे आणि धडाडीचे नेते, कामाचा अनुभव आणि मदत करण्याची इच्छा असणाऱ्या हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कॉंग्रेस कार्यकर्ते गर्भगळीत झाल्याची टीकाही त्यांनी या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केली आहे.

युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आज (ता. 14 ऑगस्ट) महाडिक यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर निदर्शन केली. त्या पार्श्‍वभूमीवर महाडिक यांनी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. 

लॉकडाउनचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार, हे स्पष्ट दिसत होते. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य घटकांसह सर्वच क्षेत्रांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार देशाच्या जीडीपीच्या दहा टक्के अर्थात 20 लाख कोटी रूपयांचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. विशेष म्हणजे त्याची अंमलबजावणी तातडीने सुरू झाली.

परिणामी देशाला महामारीची झळ तुलनेने कमी बसली आहे. शेवटच्या घटकापर्यंत मदत पोचल्याने सर्वजण समाधानी आहेत, असे पत्रकात महाडिक यांनी म्हटले आहे. 

राम मंदिर निर्माणाचे कार्य सुरू केल्याने, देशातील सर्वच जनतेची मने मोदी यांनी जिंकली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा विरोधकांनी धसका घेतला असून, विशेषत: कॉंग्रेस कार्यकर्ते गर्भगळीत झाले आहेत. म्हणूनच आत्मनिर्भर पॅकेजबाबत बालिश सवाल उपस्थित करून आंदोलन करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. पण, पॅकेजबाबत सविस्तर माहितीचा फलकच लावला असल्याने, कॉंग्रेसच्या आंदोलनाचा फज्जा उडाल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्हा कोव्हीडसाठी हॉटस्पॉट बनला आहे. रोज 15 ते 20 बळी आणि 500 हून बाधितांची भर पडत आहे. रूग्णांसाठी बेड नाही, आरोग्य यंत्रणा तोकडी, ऑक्‍सिजनची कमतरता, जेवणात अळ्या, वाढीव वीज बिलामुळे सर्वसामान्य आणि उद्योजक हैराण आहे, त्याच वेळी मार्केट कमिटीमधील नोकरभरती घोटाळा, महापालिकेत घरफाळा घोटाळा पुढे आला आहे. या सर्व प्रश्‍नांवर पालकमंत्र्यांकडून उत्तर दिले जात नाही.

सर्वकाही आलबेल असल्याचा भास निर्माण करण्यात ते मश्‍गुल आहेत. म्हणूनच या प्रश्‍नांवर उत्तरे देण्याऐवजी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आंदोलनाचा फार्स करण्यात आला, अशी टीका महाडिक यांनी केली आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT