MLA Ashok Pawar's reply to the opposition's criticism
MLA Ashok Pawar's reply to the opposition's criticism  
मुख्य बातम्या मोबाईल

समोरासमोर दोन हात करायची आपलीही तयारी : अशोक पवारांचे विरोधकांना प्रत्युत्तर 

नितीन बारवकर

शिरूर : शिरूर-हवेलीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार ऍड. अशोक पवार यांच्या वडगाव रासाई गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा पराभव झाला होता. गावपातळीपासून सुरू झालेल्या या राजकीय संघर्ष आता तालुकापातळीवर पोचला असून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या तालुका पातळीवरील नेत्यांनी आज (ता. 26 फेब्रुवारी) एकत्र येत आमदार पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्याला आमदार पवार यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. 

"एका गावच्या (वडगाव रासाई) ग्रामपंचायतीचा विषय जिल्हा आणि तालुका पातळीवरील लोकांनी एवढा प्रतिष्ठेचा करण्यापेक्षा तालुक्‍यातील इतर ग्रामपंचायतींत काय दिवे लावले ते पहावेत. आपल्या पक्षाचा परफॉर्मन्स कसा सुधारेल, यावर शक्ती खर्च करावी,'' असा उपरोधिक सल्ला आमदार ऍड. अशोक पवार यांनी विरोधकांना दिला. शिरूर तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्याचा दावाही आमदार पवार यांनी केला. 

ते म्हणाले, कोरोनाची महामारी संपलेली नाही, साथ दिवसेंदिवस फैलावत आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रत्येकानेच संयमाने वागणे गरजेचे असताना जबाबदार लोकांनी जल्लोषात सहभागी होणे, त्या जल्लोषाचे फोटो व्हायरल करणे आणि तरीही पुन्हा शिरजोर असल्याचा आव आणणे योग्य नाही. शासकीय नियमांचा भंग झाल्याने व त्याचे पुरावे "व्हॉटस ऍप'च्या माध्यमातून प्रशासनाला मिळाले. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात माझा दुरान्वयानेही संबंध नाही. मी प्रशासनाला हाताशी धरून हे केले म्हणणारांनी हे लक्षात घ्यावे की हे अधिकारी तुमच्याच काळात येथे आलेले आहेत. राजकारणात असले छुपे हल्ले करण्यापेक्षा समोरासमोर दोन हात करायची आपलीही तयारी आहे, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. 

"वडगाव रासाई ग्रामपंचायतीमध्ये आमची चाळीस वर्षे सत्ता होती. आता जनतेने ती इतरांकडे सोपविली असेल तर आम्हाला मान्य आहे. आम्ही पराभव स्वीकारतो; पण एका गावच्या राजकारणावर मोठे नेते किती शक्ती खर्च करणार आहेत? हा आमचा सवाल आहे,'' असे पवार म्हणाले. 

काय आहे प्रकरण? 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार ऍड. अशोक पवार यांचे गाव असलेल्या वडगाव रासाईतील ग्रामपंचायतीत पवार यांच्या पॅनेलचा पराभव झाला होता. त्यानंर वडगावचे नवनिर्वाचीत सरपंच सचिन शेलार यांच्या विजयी जल्लोषात सहभागी झालेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, सरपंच शेलार यांच्यासह स्थानिकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्याचा आज शिरूरमध्ये निषेध करण्यात आला होता. या वेळी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आमदार पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. 

कोण काय म्हणाले? 

गुन्हे दाखल होण्यामागे अशोक पवारांचा हात : पाचर्णे 

प्रदीप कंद, सचिन शेलार आदींवरील गुन्हे हे आकसबुद्धीने, प्रशासनाला हाताशी धरून दाखल केले आहेत. यात तालुक्‍याच्या आमदारांचा हात असल्याचा आरोप बाबूराव पाचर्णे यांनी केला. अशोक पवारांचे नाव न घेता त्यांनी टीकेची झोड उठवली. सरपंच निवडीनंतर पदाधिकारी रासाईदेवीच्या दर्शनाला जात असताना प्रदीप कंद तेथे आले. तेव्हा जल्लोष झाला. त्याचे एवढे भांडवल करून थेट गुन्हे दाखल करायला लावणे, लोकप्रतिनिधीला शोभणारे नाही. गाव आपल्या ताब्यात ठेवण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी जो त्रागा केला, तो लोकशाहीत न शोभणारा आहे. गावाने आपल्याला नाकारल्याचे आत्मचिंतन करा, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. 

यापुढेही वडगावात येतच राहणार : प्रदीप कंद 

गावपातळीवर झालेल्या पराभवामुळे चिडचिड करणाऱ्या आमदारांनी यापुढेही त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा प्रदीप कंद यांनी दिला. ते म्हणाले, वडगाव रासाई हे माझे मूळ गाव असून, आम्ही शेलार कुळातीलच आहोत. त्यामुळे माझ्या गावातील, माझ्या भावकीतील, माझा सहकारी सरपंच झाला असेल तर त्याच्या सत्कार सोहळ्याला मी जाणारच. पण त्यावरून एवढे खालच्या दर्जाचे राजकारण होईल, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतील, असे वाटले नव्हते. वास्तविक आमदार पवार यांनी पराभव मान्य करून तरुणांना मोठ्या मनाने शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. परंतू त्यांच्या कृपेमुळे आनंदाच्या क्षणी तरुण कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बसण्याची वेळ आली. गावातील पराभव त्यांना सहन झालेला दिसत नाही. सच्च्या कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होताना असले हजार गुन्हे दाखल झाले तरी डगमगणार नाही. कार्यकर्त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी यापुढेही वडगावात जातच राहणार. त्यामुळे गुन्हे दाखल होणार असतील तर त्याची पर्वा नाही, असेही ते म्हणाले. 

पवारांनी विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकविले : फराटे 

राज्याच्या सत्तेत एकत्र असल्याचा कुठलाही विचार न करता आमदारांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांखाली पोलिस ठाण्यात नेऊन बसविले, असा आरोप सुधीर फराटे यांनी केला. ते म्हणाले, ""स्वतःच्या गावातील साठ टक्केहून अधिक जनता आपल्यावर नाराज आहे. त्यामुळेच आपल्या पॅनेलचा पराभव झाला, याचे चिंतन करण्याऐवजी स्वभावशैली प्रमाणे अशोक पवारांनी विरोधकांना खोट्या-नाट्या गुन्ह्यात अडकविले. पण हा उद्योग आता त्यांच्याच अंगलट येईल.'' 

आम्ही गोंधळ घातला नाही : सरपंच शेलार 

"सरपंच-उपसरपंच निवडीनंतर आम्ही रासाईदेवीच्या दर्शनाला जात असताना काही उत्साही कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. पण त्यामुळे आम्ही अशांतता निर्माण केली, गोंधळ घातला असे झालेले नाही,'' असे वडगावचे सरपंच सचिन शेलार यांनी सांगितले. शिवाय मिरवणूक न काढण्याबाबत प्रशासनाने आम्हाला कुठलीही नोटीस बजावलेली नव्हती, असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT