Kshitij Thakur Started Work From My Office Concept
Kshitij Thakur Started Work From My Office Concept 
मुख्य बातम्या मोबाईल

वसई-विरारमध्ये 'वर्क फ्रॉम माय ऑफिस'; आमदार क्षितिज ठाकूर यांचा पुढाकार

सरकारनामा ब्युरो

वसई : येथील नोकरदारांना कामासाठी मुंबईपर्यंत करावी लागणारी पायपीट, त्यासाठी होणारा खर्च, घरातून काम करण्यास येणारी अडचण लक्षात घेता बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी 'वर्क फ्रॉम माय ऑफिस' ही संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेकांनी या ठिकाणी कामाला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही ठाकूर यांचे कौतुक केले असून देशातील हा पहिलाच उपक्रम आहे.

क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमासाठी विरार येथे दोन, वसई पूर्वेकडील वालीव येथे एक; तर नालासोपारा येथे दोन ठिकाणी 'वर्क फ्रॉम माय ऑफिस' सुरू करण्यात आले. या उपक्रमासाठी आतापर्यंत २०० जणांनी नोंदणी केली असून कामाला सुरुवात केली आहे. सुमारे ३० हजार जण काम करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच वसई, नायगाव आणि अन्य ठिकाणीही या प्रकारची व्यवस्था केली जाणार असल्याचे आमदार ठाकूर यांनी सांगितले. 

प्रत्येक केंद्रावर येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करणे, मास्क-सॅनिटायझर, इंटरनेट, जेवण, वीज, सोशल डिस्टन्सिंगसह बसण्यासाठी टेबल-खुर्ची, पिण्याच्या पाण्याची निःशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. गरजू नोकरदारांना किंवा विद्यार्थ्यांना प्रसंगी संगणकाची व्यवस्था विरार येथील केंद्रात करण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांसाठीही व्यवस्था
कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोईसाठी विवा महाविद्यालयात संगणक आणि इंटरनेटची निःशुल्क व्यवस्था करण्यात आल्याचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे नोकरदार वर्गांचे कंबरडे मोडले आहे. नोकरीवर गेले नाही तर कामावरून कमी केले जाऊ शकते. तसेच चार भिंतींच्या खोलीत कार्यालयीन काम करण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यांच्यासाठी सुविधा पुरविण्याचा हा प्रयत्न आहे.
- क्षितिज ठाकूर, आमदार, नालासोपारा.

क्षितिज ठाकूर यांनी राबवलेली संकल्पना खूप चांगली आहे. अशाप्रकारे अनेकांनी पुढे येऊन कोरोना काळात मदतीचा हात पुढे करावा.
- प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

Edited By - Amit Golwalkar


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT