Narhari Zirwal Turned Angry by Seeing Wine Bottles in Hospital
Narhari Zirwal Turned Angry by Seeing Wine Bottles in Hospital 
मुख्य बातम्या मोबाईल

रुग्णालयातील दारुची बाटली पाहून संयमी नरहरी झिरवाळ संतापले

सरकारनामा ब्युरो

नाशिक : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय यंत्रणा आणि रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा रोज आढावा घेतला जात आहे. मात्र सोमवारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालयात आकस्मिक भेट दिली. यावेळी तेथील दुरावस्था पाहून त्यांना धक्काच बसला. सर्वत्र कोरोनाविषयी अलर्ट असतांना येथील डॉक्‍टर पंधरा दिवसांपासून फिरकेलच नव्हते. विशेष म्हणजे रुग्णालयात दारूच्या रिकाम्या बाटल्या पाहून संयमी स्वभावाचे झिरवाळ एव्हढे संतापले की त्यांनी संबंधीतांवर तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. 

वणी (दिंडोरी) येथील ग्रामीण रुग्णालयात विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी सोमवारी अचानक भेट दिली. यावेळी कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. त्यांनी त्यांचे स्वागत करीत बसण्याची विनंती केली. यावेळी झिरवाळ तेथील रजिस्टर पाहू लागले. त्यांनी दोन- तीन वेळा डॉक्‍टरांना बोलवा असे सांगीतले. मात्र डॉक्‍टर काही येईनात. विचारण केल्यावर कर्मचाऱ्यांनाही सांगता येईना. त्यामुळे त्यांनी डॉक्‍टरांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन लागत नव्हता. बराच वेळ झाल्याने त्यांनी संतापून त्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.

तेव्हा मुख्य वैद्यकीय अधीक्षक अरुण पवार रुग्णालयात हजर नसल्याचे दिसले. याबाबत अधिक चौकशी केली असता उपस्थित कर्मचाऱ्यांनी ते रजेवर असल्याचे सांगितले. परंतु त्यांच्या गैरहजर राहण्याच्या नियमित तक्रारी यापूर्वीही आमदारांकडे स्थानिकांनी केल्या होत्या. म्हणून चौकशीसाठी झिरवाळ यांनी नाशिक येथे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी मोबाईलवरून चौकशी केली असता ते वैद्यकीय अधीक्षक रजेवर नसल्याचे समजले. 

वैद्यकीय अधिक्षक फिरकलेच नाहीत

सर्वत्र कोरोना संसर्ग वाढत असतानाही रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक पंधरा दिवसांपासून रुग्णालयात फिरकले नसल्याचा धक्कादायक प्रकार आमदार झिरवाळ यांनी उघडकीस आणला. तर अस्वच्छतेने रुग्णालयाचेच आरोग्य बिघडल्याचेही निदर्शनास आल्याने त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क करीत कारवाईचे आदेश दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असल्याने विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ दिंडोरी तालुक्‍यातील वैद्यकीय सेवेचा आढावा घेत आहेत. त्यामध्ये त्यांनी वणीतील ग्रामीण रुग्णालयास अचानक भेट दिली. 

या वेळी वणीचे उपसरपंच मनोज शर्मा, राजेंद्र गोतरणे आदींनी रुग्णालयातील गैरकारभाराचा व रुग्णांच्या होणाऱ्या हेळसांडीचा पाढा झिरवाळ यांच्यासमोर वाचला. झिरवाळ यांनी रुग्णालयातील आंतररुग्ण कक्ष, स्वच्छतागृहाची पाहणी केली असता तेथे चक्क मद्याची बाटली दिसली. ती बाटली पाहून तर संयमी स्वभावाचे झिरवाळ देखील चांगलेच संतापले. रुग्णालयात कुठेही सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे तसेच रुग्णालयात टेबल व अन्य कपड्यावर रक्ताचे डाग दिसून आले. या वेळी शरद महाले, किशोर शेलार, राजू परदेशी आदी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT