MLA Sanjay Shinde clarified his Role regarding the water of Ujani dam
MLA Sanjay Shinde clarified his Role regarding the water of Ujani dam  
मुख्य बातम्या मोबाईल

उजनीच्या पाण्याबाबत संजय शिंदेंनी सोडले मौन....अजितदादा सर्वोच्च; पण..?

अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : पुणे जिल्ह्यातील इंदापूरला उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातून तीव्र स्वरूपाचा विरोध सुरू झाला आहे. शेतकरी संघटनांसह विविध राजकीय नेत्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत करमाळ्याचे लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका काय? असा मुद्दा उपस्थित केला जात होता. आमदार संजय शिंदे सध्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते क्वारंटाइन आहेत. मात्र, इंदापूरला दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रश्नाबाबत आपले मौन सोडले आहे. उजनीच्या पाण्यासंदर्भातील आपली भूमिका त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत जाहीर केली आहे.

फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये आमदार संजय शिंदे यांनी म्हटले आहे की, मी संजयमामा शिंदे. माझ्या व माझ्या नेत्यांच्या संबंधित विरोधक नेहमीच गैरसमज व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. माझे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पवार कुटुंबीय यांच्या संदर्भात माझ्या जीवनात असाधारण महत्त्व आहे आणि ते मी माझ्या हृदयात जपलंय. त्याचा इतरांच्या सारखा बाजार कधीच मांडला नाही. त्या भांडवलावर कधीच कुठलं पद मिळवले नाही वा कोणत्याही संस्था वाचवण्यासाठी त्याचा वापर केला नाही. जेव्हा कधी वेळ आली, तेव्हा इतर नेत्यांसारखा पळसुध्दा काढलेला नाही. शेवटच्या क्षणी नेत्यांनी जो आदेश दिला, तो मी पाळला आहे. भलेही त्यात माझा राजकीय नफा तोटा झाला असेल. असो....

उजनी धरणाच्या ५ टीएमसी पाण्यासंदर्भात मी जाहीरपणे सांगतो. जर चुकीच्या पद्धतीने काही घडल्यास मी सोलापूर जिल्हावासीयांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढेन. गरज पडल्यास मी माझ्या मतदारसंघासाठी व सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी सर्वस्व पणाला लावेन. पण...उजनी धरणांमधलं सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे १ थेंबही पाणी मी इतरत्र वळवू देणार नाही, अशी भूमिका आमदार संजय शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जाहीर केली आहे.

काय आहे निर्णय?

उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी ५ टीएमसी पाणी उचलण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील २२ गावांसह एकूण ५८ गावांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. त्यातून तालुक्यातील सुमारे ६५ हजार एकर शेतीला फायदा होणार आहे. इंदापूरच लोकप्रतिनिधी आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. 

कुंभारगाव परिसरातील उजनी जलाशयातून १० हजार एचपी क्षमतेच्या विद्युत पंपाद्वारे हे पाणी उचलले जाणार आहे. ते पाणी सुमारे १० किलोमीटर अंतरावरील शेटफळगढे परिसरातील खडकवासला कालव्यात टाकले जाणार आहे. तेथून हे पाणी सणसर कटद्वारे नीरा डाव्या कालव्यावरील २२ गावांतील शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे.

या योजनेसाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी खर्च अपेक्षीत असून ही योजना पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कलावधी जाणार आहे. या योजनेचा सर्व्हे करण्याचा आदेश देण्यात आला असून चार महिन्यांत सर्व्हे पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर योजनेचे काम पूर्ण होणार असून जलसंपदा मंत्रालयाने याबाबत सरकारी निर्णय पारित केल्याचे राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT