मुख्य बातम्या मोबाईल

मनसे कार्यकर्त्यांनी बाहेरील पदार्थ थेटरमध्ये नेऊन खाल्ले 

सरकारनामा ब्युरो

मुंबईः बाहेरील खाद्यपदार्थांना अटकाव करण्याच्या मल्टिप्लेक्‍स चालकांच्या मनमानीविरुद्ध सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी परळच्या "पीव्हीआर'मध्ये सविनय कायदेभंग आंदोलन केले. त्यांनी तिकिट काढून बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेऊन खाल्ले. 

मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी पंधरा कार्यकर्त्यांसह दुपारी पावणेतीनच्या खेळाची तिकिटे काढली. त्यांनी आपल्यासोबत सामोसेही नेले होते. त्यांनीच पूर्वसूचना दिल्याने पोलिसही तेथे हजर होते. चित्रपटगृहाच्या सुरक्षारक्षांनी त्यांची झडती घेऊन खाद्यपदार्थ आत नेऊ शकत नाही असे सांगितले. 

पोलिसांनीही सुरक्षारक्षकांची बाजू घेतली. जणू या संधीची वाट पहात असलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी लगेच जोरदार भांडण सुरू केले. "खाणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे, तुम्ही आम्हाला त्यापासून रोखू शकत नाही', असे त्यांनी सुरक्षारक्षकांना सुनावले. पोलिसांशीही त्यांना बराच वादविवाद करावा लागला. शेवटी, तुम्ही चित्रपटगृहाचे रक्षक आहात की जनतेचे? तुम्ही का मध्ये पडत आहात, असे त्यांनी पोलिसांनी ऐकवले. शेवटी हे कार्यकर्ते तसेच आत गेले व तेथेच बसून त्यांनी सामोसे खाल्ले. नंतर आत जाऊन काही वेळ चित्रपट पाहून ते सर्वजण निघून गेले. 

बाहेरील खाद्यपदार्थ एक ऑगस्टपासून चित्रपटगृहात नेऊ देण्याबाबतचा जीआर चित्रपटगृहांना मिळाला नाही, असे पोलिसांचे म्हणणे होते; पण हा आमचा दोष नाही. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली होती. त्याला काहीच किंमत नाही का, असा प्रश्‍नही आंदोलकांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT