Raj Demands Insurance Cover to Private Doctors
Raj Demands Insurance Cover to Private Doctors 
मुख्य बातम्या मोबाईल

खासगी डाॅक्टरांनाही विम्याचे संरक्षण द्या; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारनामा ब्युरो

मुंबई : खासगी सेवेतील डाॅक्टरचा कोरोना काळात सेवा देताना कोविडमुळे मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ देण्याचं सरकार नाकारत आहे. यात लक्ष घालून संबंधित डाॅक्टरांना विमा मिळवून देण्याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

काही खासगी डाॅक्टरांचे शिष्टमंडळ राज यांना भेटायला गेले होते. त्यावेळी या डाॅक्टरांनी ही व्यथा त्यांच्याकडे मांडली. त्यानंतर राज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी खासगी डाॅक्टरांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. 

'कोरोना काळात या आजाराचा संसर्ग जसा पसरु लागला, तसा सरकारी आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व खासगी दवाखाने रुग्णालये, पॅथाॅलाॅजी लॅब यांना सेवा बंद न करण्याचा व रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज राहण्याचा आदेश दिला. त्यानुसार राज्यातील बहुसंख्य खासगी डाॅक्टरांनी आपली बांधिलकी लक्षात घेऊन सेवा सुरु ठेवली,' असे राज यांनी या पत्रात नमूद केले आहे.

'यातच महाराष्ट्र सरकारचे अजून एक परिपत्रक आले की कोरोनाच्या काळात डाॅक्टर्स, इतर वैद्यकीय कर्मचारी, मग ते खासगी सेवेत असोत की सरकारी रुग्णालयांच्या सेवेत असोत, ह्या सगळ्यांना विम्याचे कवच असेल व यापैकी कोणाचाही कोविडमुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ह्या विम्यातून ५० लाख रुपये दिले जावेत. पण आता खासगी डाॅक्टरांना विम्याचे कवच देण्याचे सरकार नाकारत आहे,' असेही राज यांनी या पत्रात म्हटले आहे.

जर केंद्र सरकारच्या योजनेनुसार खासगी सेवेतील डाॅक्टर्स व अन्य कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच उपलब्ध असेल तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? असा सवाल राज यांनी या पत्रात उपस्थित केला आहे. सरकार खासगी डाॅक्टरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देणार व स्वतः आपली जबाबदारी विसरणार हे चूक आहे, असेही राज यांनी पत्रात नमूद केले आहे.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT