MP Omprakash RajeNimbalkar Demands Fair pricing for Farmers
MP Omprakash RajeNimbalkar Demands Fair pricing for Farmers 
मुख्य बातम्या मोबाईल

कांदा खाणाऱ्यांवर नव्हे तर पिकविणाऱ्यांवर आत्महत्येची वेळ : खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

सरकारनामा ब्युरो

उस्मानाबाद : कांदा खाणारा माणूस कधी आत्महत्या करीत नाही, कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आत्महत्येची वेळ येत असल्याची भावना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेच्या अधिवेशनात व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हक्काचा भाव त्याला मिळाला पाहिजे शेतकरी रक्ताचे पाणी करुन शेतीमाल पिकवित असतो. त्यामुळे त्याचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी सभागृहात मांडली. 

लोकसभेच्या अधिवेशनात शेती उत्पादन, व्यापार, व वाणिज्य विधेयक मध्ये चर्चेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सहभाग नोंदवुन विविध दुरुस्त्या सुचवल्या. यावेळी खासदार राजेनिंबाळकर म्हणाले, "केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला २०२२ पर्यंत हमीभाव देण्याची घोषणा केली आहे, पण नुसत्या घोषणा करुन हे साध्य होऊ शकणार नाही. त्यासाठी सरकारने उपाययोजना राबवून त्यादृष्टीने पाऊले टाकणे अपेक्षित आहे,"

शेतकऱ्यांकडून प्रामुख्याने आधारभुत किंमतीनुसार व्यापाऱ्यांनी शेती माल खरेदी करणे आवश्यक आहे, असे  शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देणे अत्यावश्यक बनले असल्याचीही मागणी त्यांनी संसदेत केली. नवीन विधेयकामध्ये शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ खुली केल्याने निश्चितपणे त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. पण यामध्ये लहान तथा अल्पभुधारक शेतकरी त्याचा माल इतर राज्याच्या बाजारपेठेत कसा घेऊन जाणार हा प्रश्न उपस्थित करुन खासदार ओमराजे यांनी बाहेर राज्यात शेती मालाची वाहतूक करण्यासाठी वाहतुक अनुदान देण्याची मागणी केली आहे.

याशिवाय शेतकऱ्यांचा माल घेऊन जाण्यासाठी व्यापाऱ्यांची त्यांच्या बांधावर हजेरी लावल्याची अनेक उदाहरणे दिसतात पण पैसे देण्याची वेळ आल्यावर तो व्यापारीच गायब होतो, असे प्रकार पाहायला मिळतात. नवीन विधेयकामध्ये शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्याचे पेंमेट करण्याची बाब स्वागतार्ह असल्याचेही खासदार राजेनिंबाळकर यानी सांगितले. शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाराचे नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य करावे, तसेच कांदा निर्यात बंदी उठवावी ही प्रमुख मागणी यावेळी खासदार ओमराजे यानी केली. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतमालाचे अनुदान शेतकऱ्यास देण्यासह इतरही दुरुस्त्या त्यांनी या विधेयकात  सुचविल्या आहेत.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT