MPSC Exam postponed prakash ambedkar criticise CM Uddhav thakarey
MPSC Exam postponed prakash ambedkar criticise CM Uddhav thakarey 
मुख्य बातम्या मोबाईल

MPSC Exam : श्रीमंत मराठ्यांच्या दबावाला सरकार बळी पडतंय!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्याने सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षांतील नेत्यांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. श्रीमंत मराठ्यांच्या दबावाला सरकार बळी पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

एमपीएसची परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यभरात परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारच्या या निर्णयावरून टीका केली आहे. आंबेडकर यांनी या निर्णयामुळे ओबीसी, एससी, एसटी या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे म्हटले आहे. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कोरोना वाढत असल्याचे कारण दिले आहे. मात्र, राज्य शासन श्रीमंत मराठ्यांना बळी पडत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी कणा दाखवत परीक्षा घ्याव्यात, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले. 

विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण

परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे परीक्षा स्थगितीचा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही सरकारने चुकीचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने मुंडे यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 

वयोमर्यादा वाढवा 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारी नोकऱ्यांसाठी दोन वर्षांची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी केली आहे. प्रत्येक विद्यार्थी परीक्षेसाठी २-३ वर्ष तयारी करत असतो. त्यामागे अनेक वर्षांची मेहनत असते. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरणे साहजिकच आहे, असे पाटील यांनी सांगितले. 

वरळीत पब सुरू मग परीक्षा का नाही

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. लोकलमध्ये लाखो लोक दाटीवाटीने प्रवास करत आहेत. अधिवेशनही झाले. काँग्रेसच्या आंदोलनात लाखो लोक होते. वरळीत पब सुरू आहेत. मग परीक्षाही घेता आल्या असत्या, असे दरेकर म्हणाले. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकार खेळत आहे, अशी टीका दरेकर यांनी केली. 

या मुलांची जबाबदारी सरकारची नाही का?

परीक्षा लांबणीवर टाकण्याचा आततायीपणा करू नये. किती दिवस मुला-मुलींना अधांतरी ठेवणार? माझे कुटूंब, माझी जबाबदारी म्हणता, मग या मुलांची जबाबदारी सरकारची नाही का, यमांत भेदभाव का, असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला. नाईट क्लब, निवडणुका सर्व नियम तोडून सर्रास चालू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT