Mumbai Filled with Rainwater
Mumbai Filled with Rainwater 
मुख्य बातम्या मोबाईल

मुंबई वाचवण्यासाठी मैदानांखाली तळी; 'तुंबई'वर महापालिकेचा नवीन प्रयोग

सरकारनामा ब्युरो

मुंबई  : मुसळधार पावसानंतर मुंबईत पुरसदृश परिस्थिती निर्माण होते. त्यातून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यातून सुटका करण्यासाठी मुंबई महापालिका मैदानांखाली तळी तयार करून त्यात पावसाचे पाणी साठवणार आहे. या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी लवकरच समिती स्थापन करून निविदा काढण्याची शक्‍यता आहे.

दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबून मुंबई किमान दोनतीन वेळा ठप्प होते. यावर उपाय म्हणून तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी जपानी पद्धतीने भूमिगत जलाशय तयार करण्याचा पर्याय सांगितला होता. त्यासाठी त्यांनी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीबरोबर चर्चाही केली होती. या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी पाच कोटी रुपयांची तरतूदही महापालिकेने केली होती; मात्र एकच मोठे भूमिगत जलाशय बांधून त्यात पाणी साठवून ठेवणे खर्चिक होणार असल्याचा दावा करत पालिकेने आता जपानी प्रयोग बाजूला ठेवून दक्षिण कोरियाचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार पावसाचे पाणी अडवण्यासाठी भूमिगत लहान लहान तळी करण्यात येणार आहेत. मुंबईतील मैदानांखाली तळी बांधण्याचा विचार सुरू आहे, असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेऊन 'वॉटर होल्डिंग टॅंक'चा पर्याय विचारधीन आहे. त्यावर महापालिकेने काम करावे. राज्य सरकार त्यांना पाठिंबा देईल असे स्पष्ट केले आहे.

अशी असतात तळी
मुंबईतील पावसाचे पाणी नदी, नाले, खाड्यांमधून नैसर्गिकरीत्या समुद्रात जाते; मात्र समुद्राला भरती असल्यास पाण्याचा निचरा होत नाही. यावर उपाय म्हणजे हे पावसाचे पाणी तळ्यांमध्ये साठवून भरती ओसरल्यावर ते समुद्रात सोडणे. या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापरही करता येईल.

काय करावे लागेल?
मुंबईतील विशेषत: दक्षिण मुंबईतील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या या ब्रिटिशकालीन (१०० वर्षांहून जुन्या) आहेत. पावसाळी पाणी याद्वारे एका मार्गातून समुद्र आणि खाडीपर्यंत घेऊन जातात; मात्र त्यांचा मार्ग बदलून प्रामुख्याने मैदानाखाली तयार करण्यात येणाऱ्या तळ्यापर्यंत नेण्याची कल्पना आहे. त्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी पर्जन्यवाहिन्यांचा नवीन आराखडा तयार करावा लागेल.
Edited By - Amit Golwalkar


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT