Mumbai Local Train
Mumbai Local Train 
मुख्य बातम्या मोबाईल

१ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळांमध्ये मुंबईकरांसाठी लोकल सेवा सुरु

सरकारनामा ब्युरो

मुंबई  : कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.  

यामुळे सर्वाना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वाना सुविधा होईल असेही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  म्हटले आहे.  

विशिष्ट वेळांच्या मर्यादेत  मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती.  यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. 
सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते, त्यप्र्माने आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी खालीलप्रमाणे ही सेवा उपलब्ध असणार आहे-

कधी प्रवास करता येईल
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल

कधी प्रवास करता येणार नाही
म्हणजेच सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील. 

सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची  आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा अशी विनंती देखील मुख्य सचिव यांच्या या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.  
या  बाबतीतली सुचना  मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील कळविण्यात आली आहे. 

उपहारगृहे व दुकानांसाठी वेळा
 मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT