Dhananjay Munde  .jpg
Dhananjay Munde .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

मुंडे झाले भावनिक अन् म्हणाले, उपकाराची परतफेड अंगावरील कातड्याची जोडे करून होणार नाही!

सरकारनामा ब्यूरो

बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झााल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यांच्यावर समाज माध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या, अखेर धनंजय मुंडेंनी या सर्व प्रकरणावर मौन सोडलं आहे. ते बीड येथील एका कार्यक्रमात बोलत होते. 

एखाद्या भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, अशा कठीण प्रसंगामध्ये आपण सर्वांनी माझ्या पाठीशी साथ उभी केली. मी शब्दात आभार मानू शकत नाही. आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरील कातड्याची जोडे करून जरी आपल्याला घातली तरीही ती फिटू शकत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले. 

आजपर्यंत अनेक संकटाला सामोरे गेलो. सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहोचलो. जीवनामध्ये मी कोणाचेही मन दुखवून स्थान निर्माण केले नाही. मन जिंकून मी स्थान निर्माण केलंय. मी आपले सुद्धा मन जिंकले म्हणून आपण माझ स्वागत केल, असंही धनंजय मुंडे म्हणाले. 

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?  

कुणावर कर्ज झाले असेल, तर कर्ज फेडण्यासाठी आम्ही आमची जमीन गहाण ठेवून मदत करू शकतो. कुणाला आजार झाला असेल तर रक्तदान करू शकतो. पण, ह्याला संकट कसं म्हणावं आणि ह्यात मदत कशी करावी. या प्रकरणाचा मी स्त्री म्हणून, सामजिक नेत्या म्हणून की सैद्धांत म्हणून विचार करावा, असा मला प्रश्‍न पडतो. त्यामुळे या प्रकरणाचं आयुध मी केलं नाही, ह्याचं अस्त्र केलं नाही, हीच त्यांना फार मोठी मदत आहे,'' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना बलात्कार आरोपाच्या संकटाच्या काळात मदत केली का? या प्रश्‍नाला उत्तर दिले होते. 

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. मात्र, त्यांच्या परळीतील राजकीय विरोधक आणि बहीण पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आली नव्हती. त्या आज (ता. 25 जानेवारी) विविध वृत्तवाहिनीशी बोलल्या. त्या वेळी त्यांनी मुंडे प्रकरणावर भाष्य केले होते.  

"धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर माझ्या मनात प्रचंड अस्वस्थता होती. या प्रकरणी मी जाणीवपूर्वक कुठलाही बाइट दिला नाही. अशा घटनांप्रकरणी बाइट देण्याची घाई करत नाही. मी अशा विषयांकडे वेगळ्या पद्धतीने बघते. मी व्यथित आणि अस्वस्थ होते. या गोष्टीचे राजकारण करावं आणि विरोधक म्हणून या गोष्टीचा फायदा घ्यावा, असा मला क्षणभरही वाटलं नाही,'' अशा शब्दांत पंकजा यांनी आपल्या भावना मांडल्या होत्या.  

त्या म्हणाल्या, "सत्तेत असताना मी अनेक संघर्ष सहन केले. पण मी सहन केले; म्हणून दुसऱ्याला तसं वागवावं, असं मला कधीच वाटलं नाही. माझं भावनिक व पारिवारीक नातं वेगळीकडं आहे. पण, मी आज राजकीय आणि सामाजिक जीवनात आहे. त्यामुळे सामजिक जीवन हे नियमांच्या चौकटीतच जगायचं असतं. प्रेम, माया आणि काळजी एका बाजूला आहेच, त्यात काही वाद नाही. पण, सैद्धांतिकदृष्ट्या मी या गोष्टीचं समर्थन कधीच करू शकत नाही.'' 

"धनंजय मुंडे यांना सल्ला देण्याचे कोणतेही कारण नाही. आम्ही दोघंही आता दोन विचारधारांमध्ये काम करत आहोत. मला जेवढी अस्वस्थता आणि प्रश्‍न पूर्वी होते, तेवढेच आताही आहेत. त्यामुळे त्यांना वैयक्तीक साद घालण्याचा किंवा सल्ला देण्याचा प्रश्‍नच यात येत नाही. मी एवढंच सांगेन की अशा प्रकरणाला अस्त्र बनवून माझी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न मी करणार नाही. पण जे चूक आहे, ते चूकच आहे आणि जे बरोबर आहे, ते बरोबरच आहे, त्याच्यात माझी भूमिका बदलणार नाही,'' असेही त्यांनी नमूद केले होते. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT