Nana Patole .jpg
Nana Patole .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

फोन टॅपिंगमध्ये माझा अमजद खान करण्यात आला!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विधिमंडळात मंगळवारी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. २०१६-१७ मध्ये राज्यातील आमदार, खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले, यासाठी माझा फोन नंबर अमजद खान नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी नाना पटोले यांनी सभागृहात केली. (Nana Patole raised the issue of phone tapping in the Assembly)  

पटोले यावेळी म्हणाले की, अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला. नंबर माझा आणि अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवण्यात आले. मुस्लीम धर्माचे नाव देऊन हिंदू मुस्लीम वाद निर्माण करुन राजकारण करायचे होते काय? माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जिवनातून बरबाद करण्याचे काम करण्याचा हा प्रयत्न आहे. सभागृहातच अनिल देशमुख करु, भुजबळ करू, अशा धमक्या दिला जात आहेत हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.

या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे परंतु तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडल्याचे दिसत नाही. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. उद्याच या प्रकरणी उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहितीही घेऊ असे वळसे पाटील यांनी सभागृहाला सांगितले.  

दरम्यान, भाजपने अधिवेशनावर बहिष्कार टाकत विधान भवनाच्या बाहेर अभिरूप विधानसभा भरवली होती. वृत्तवाहिन्यांवरुन या अभिरुप विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू केल्याने आक्षेप घेण्यात आला. यावर हे प्रक्षेपण तातडीने थांबवण्याचे आदेश तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले.

आमदारांच्या निलंबनानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांनी आंदोलन केले. त्यानंतर सभागृहाबाहेरच भाजपने प्रतिविधानसभा भरवली. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना प्रतिविधानसभेच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले आहे होते. मात्र, या साठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे ते थांबवण्याचे आदेश देण्यात आले. 

भाजपच्या प्रतिविधानसभेवर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला होता. विधानसभेच्या आवारात परवानगी नसताना काहीही करता येत नाही. विरोधक तिथे स्पीकर लावून भाषणे देत आहेत. भास्कर जाधव यांच्या आक्षेपावर अध्यक्षांनी सांगितले, होते की विरोधी पक्षाने कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे त्यांचा माईक बंद केला पाहिजे, अशी मागणी जाधव यांनी केली होती. त्यानंतर भास्कर जाधव यांची तालिका अध्यक्ष पदी नियक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या अभिरुप विधानसभेचे कामकाज बंद करण्याचे आदेश दिले. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT