नाशिक : सारस्वतांसह साहित्य रसिकांना पर्वणी ठरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजित वेळेत न होण्याचे संकेत मिळत आहेत. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९४ वे साहित्य संमेलन पुढे ढकलणार असल्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समजत आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे हे संमेलन घेणे कितपत सुरक्षित आहे याबाबत बैठक पार पडल्याचे समजत असून प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील औरंगाबादमधून संमेलनाबाबत पत्रकारपरिषद घेऊन संमेलन स्थगितीबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
संमेलनाच्या नियोजनाबाबत संमेलन समन्वयक समीर भुजबळ, मुख्य समन्वयक विश्वास ठाकुर, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांच्यात बैठक झाली असून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशीही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. संमेलन दिल्लीला न घेण्यामागे आर्थिक वर्षात निधी खर्चाबाबतचे नियोजन हेही कारण समोर येत होते मात्र संमेलनाच्या खर्चाबाबत पुढील आर्थिक वर्षात सरकारची परवानगी घेऊन अडचण दूर केली जाणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, संमेलन पुढे ढकलले गेल्यास मे महिन्यात संमेलन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन पुढे ढकलावे अथवा ऑनलाइन पद्धतीने घ्यावे, असा सूर साहित्यिक आणि नाशिककरांकडून येऊ लागला होता. बाहेरून येणाऱ्यांकडून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो याची शक्यताही नाकारता येत नव्हती. राज्यात सध्या मुंबई, पुणे, ठाणे आणि विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यासाठी आयोजकांनी सावध भूमिका घेण्याचे ठरविले आहे.
स्वागताध्यक्ष छगन भुजबळही कोरोनाग्रस्त
संमेलनाच्या स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांना आठवडाभरापूर्वीच कोरोना झाल्याने ते उपचार घेत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत संमेलनासंदर्भात घोषणा होणार नाही. त्यामुळे नाशिकमध्ये होणारे संमेलन आता पुढे ढकलणार असल्याची चर्चा सुरू आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष हजर नसतानाच हे संमेलन पुढे ढकलले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समजत आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.