kailas Jadhav
kailas Jadhav 
मुख्य बातम्या मोबाईल

`सुपर स्प्रेडर्स’ रोखण्यासाठी नाशिकला तीस पथके

सरकारनामा ब्युरो

नाशिक : महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात कोरोनाचा संसर्ग किराणा दुकानदार, फळ, भाजी विक्रेते, सलून चालक व औषध विक्रेत्यांच्या माध्यमातून होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. 

यासंदर्भात कोरोनाचा ‘सुपर स्प्रेडर्स’ रोखण्यासाठी वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून आरटीपीसीआर टेस्ट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तीस वैद्यकीय पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर यादरम्यान कोरोना संसर्गाने उच्चतम पातळी गाठली होती. ऑक्टोबरमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच अंदाज चुकीचा ठरला. उलट ऑक्टोबरपासून कोरोना परिस्थिती नियंत्रणात येण्यास सुरवात झाली. जानेवारीत शंभरच्या आत रोज रुग्ण आढळत असल्याने कोरोनासंदर्भातील भीती दूर झाली. त्यानंतर मात्र लग्न सोहळे, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नागरिक गर्दी करू लागले. गर्दी करताना कोरोना संसर्गाला दूर ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी होत नव्हती. परिणामी कोरोना संसर्ग पुन्हा वाढीस लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत पाच ते सातपट वेगाने कोरोना संसर्ग वाढला.

एक हजार ते दीड हजाराच्या आसपास रुग्ण आढळल्याने कोरोनाने पुन्हा उचल खाल्ली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हादरली. कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या गेल्या. मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर त्रिसूत्रीची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग वाढण्याच्या कारणांचा शोध घेताना सिडको, जुने नाशिक व पंचवटी विभागातील रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात किराणा दुकानदार, फळविक्रेते, भाजी विक्रेते, औषध विक्रेते, हातगाडीवरील विक्रेते, सलून चालकांचा नागरिकांशी रोजचा संबंध येत असल्याचे समोर आले. त्यामुळे शहरातील सर्व विक्रेत्यांची कोरोनाची रॅपिड ॲन्टिजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

...
कर्मचाऱ्यांची तापसणी
महापालिका मुख्यालय व विभागीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याने दोन दिवसांपासून महापालिकेचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. व्यावसायिक, विक्रेत्यांचा नागरिकांशी सातत्याने संपर्क येत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे सर्वांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT