nilangeksr snubs amit deshmukh
nilangeksr snubs amit deshmukh 
मुख्य बातम्या मोबाईल

ज्यांनी लातूरात टाॅयलेट उभारले नाही; ते उजनीचे पाणी काय आणणार? : निलंगेकरांचा अमित यांना टोला

सुशांत सांगवे

लातूर : लातूर शहराच्या आजूबाजूला ज्यांचे साखर कारखाने आहेत, त्यांनीच लातूरकरांचे पाणी चोरले आहे. तेच लोक खरे दोषी आहेत. स्वतःसाठी ज्यांनी कारखाने उभारले त्यांची लातूरकरांप्रती काही जबाबदारी आहे की नाही, अशा शब्दांत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आमदार अमित देशमुख यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

'त्यांचा' नवा कारखाना लातुरात होऊ देणार नाही. इथल्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत त्याला माझा विरोध राहील, असे आव्हानही त्यांनी या वेळी दिले.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शनिवारी (ता. ३१) लातूर जिल्ह्यात आली. अहमदपूर, उदगीर येथे जाहीर सभा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातुरात भर पावसात सभा झाली. त्यांच्या भाषणाआधी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच जोरदार बॅटिंग केली. दुष्काळाच्या विषयावर देशमुख यांच्यावर टीका करण्याची संधी त्यांनी या वेळी सोडली नाही.

निलंगेकर म्हणाले, "इथल्या काँग्रेस नेतृत्वावर लोकांचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जागांवर आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आम्हाला आहे. मुख्यमंत्र्यांनी लातूरला भरभरून दिले आहे. दुष्काळ असताना पाण्याची ट्रेन लातूरला पाठवली. पण इथल्या आमदारांनी लातुरसाठी काहीही केले नाही. त्यांची काही जबाबदारी आहे की नाही? उजनीचे पाणी लातुरात आणू, असे ते म्हणतात. ज्यांना लातुर शहरात साधे स्वच्छतागृह उभारता आले नाही ते काय उजनीचे पाणी आणणार?"

हा काँग्रेसचा बालिशपणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेदरम्यान बाभळगाव येथे जाणार आहेत. या वेळी त्यांना देशमुख यांच्या निवासस्थानी चहासाठी बोलावण्यात आले आहे, अशी पोस्ट सोशल मीडियात दिवसभर फिरत होती. यावरून देशमुख यांच्या बिजेपी प्रवेशबाबत तर्कही लढवले जात होते. याबाबत निलंगेकर म्हणाले, काँग्रेसने हा बालिशपणा थांबवावा. आम्ही योग्यता पाहून चांगल्या लोकांना पक्षात घेत आहोत. यांची योग्यता कशी आहे, हे लातुरातील जनतेला चांगलेच माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT