Nagpur Mayor Election in January
Nagpur Mayor Election in January 
मुख्य बातम्या मोबाईल

प्रथमच निवडणूक न घेता बदलणार नागपूरचा महापौर

राजेश प्रायकर

नागपूर : महापौर संदीप जोशी यांच्या पक्षाने निश्चित केलेला कार्यकाळ पुढील महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यानंतर नव्या महापौरांचा प्रस्ताव पुढील महिन्यातील सभागृहात येणार आहे. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी महापौर नियोजित केले आहे. जोशी यांचा राजीनाम्यानंतर तिवारी यांच्या नावाचा रीतसर प्रस्ताव सभागृहात येणार आहे.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये शहर भाजपाध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी जोशी व तिवारी यांना सव्वा सव्वा वर्ष महापौरपद देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. नंदा जिचकार यांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात येताच तिवारी यांनी महापौरपदावर दावा केला होता. त्यांच्यासोबतच जोशी यांचेही नाव चर्चेत होते. त्यामुळे दोघांनाही महापौरपद वाटून देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता.

महापौर जोशी यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यानंतर दयाशंकर तिवारी शहराचे ५४ वे महापौर म्हणून सूत्रे स्वीकारतील. मात्र, यासाठी तांत्रिक बाबीची पूर्तता करावी लागणार आहे. जोशी यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानंतर समिती विभागाकडून नव्या महापौरांच्या निवडीसाठी सभागृहाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

जोशी यांना भाजपच्या त्यावेळी उपस्थित असलेल्या १०४ नगरसेवकांनी मते दिली होती. परंतु, आता महापौर राजीनामा देत असल्याने त्यांच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून तिवारी यांची निवड होणार आहे. किंबहुना पक्षाने ही निवड आधीच करून ठेवली आहे. त्यामुळे सभागृहात केवळ तिवारी यांच्या नावाचा प्रस्ताव येईल. यात कुठेही निवडणुकीची प्रक्रिया राहणार नाही.

महापौरांच्या राजीनाम्याची दिवसभर चर्चा
पदवीधर निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तसेच महापौरपदाचाही कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिल्याची दिवसभर चर्चा रंगली होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे अनेक नागरिकांनी याबाबत खात्री करून घेतली. एवढेच नव्हे नगरसेवक, पदाधिकारीही नागरिकांच्या फोनमुळे त्रस्त झाले. परंतु, जोशी यांनी राजीनामा दिला नसल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी स्पष्ट केले.

२० डिसेंबरला सभागृह
मागील वर्षी सव्वा सव्वा वर्षे महापौरपदाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसारच नवीन महापौर होतील. यासाठी सभागृहात प्रस्ताव येईल. २० डिसेंबरला सभागृह आहे. परंतु, या सभागृहात हा प्रस्ताव येणे आता शक्य नाही. त्यामुळे पुढील सभागृहात प्रस्ताव येईल. - संदीप जाधव, सत्तापक्ष नेते, महापालिका
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT