No enough water in PCMC Model ward
No enough water in PCMC Model ward 
मुख्य बातम्या मोबाईल

मॉडेल वॉर्डमध्येच विस्कळीत पाणीपुरवठा

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : पाणीपुरवठा करणारे पवना धरण यावर्षी भरूनही व शहरात दिवसाआड पाणीपुरवठा असून सुद्धा हिवाळ्यातच  पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीप्रश्न डोकावू लागला आहे. शहराच्या मध्यवस्तीत उपमहापौरांच्या प्रभागातच काही दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठा सुरु आहे. तो सुरळीत केला नाही,तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल,असा इशारा या  प्रभागातील (क्र.१०) भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पालिका आय़ुक्तांना दिला. त्यामुळे हा पालिकेतील सत्ताधारी भाजपला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

विद्यमान उपमहापौर केशव घोळवे, माजी उपमहापौर भाजपचेच तुषार हिंगे आणि माजी महापौर मंगला कदम व गोरखे यांचा हा प्रभाग आहे. गत टर्मला या प्रभागातील कदम यांचा वॉर्ड मॉडेल करण्याचे ठरले. त्यानुसार तेथे मोठा खर्च करून कामे झाली होती. तेथेच हा पाणीप्रश्न डोकावू लागला आहे. विशेष म्हणजे धरणात मुबलक पाणी असूनही हिवाळ्यातच कमी दाबामुळे कमी पाणी गेले काही दिवस या प्रभागातील रहिवाशांना मिळत आहे .त्यामुळे उन्हाळ्यात काय होईल,अशी भीती प्रभागातील नागरिकांना वाटते आहे. 

पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा आणि पुरेसे पाणी मिळावे म्हणून शहरात गेल्या वर्षभरापासून दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे. अगदी पावसाळ्यात सुद्धा त्यात खंड पडला नव्हता.त्यानंतर सुद्धा हिवाळ्यातच पाण्याच्या तक्रारी सुरु झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग १० मध्ये शाहूनगर, संभाजीनगर,मोरवाडी,म्हाडा,दत्तनगर,लालटोपीनगर,विद्यानगर टिपू सुलतानगरमध्ये विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे रहिवाशांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे गोरखे म्हणाल्या. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवावा,यासाठी त्यांनी आय़ुक्तांना निवेदन दिले. 

पण,आयुक्त श्रावण हर्डीकर हे कालच आठ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे आय़ुक्तपदाची तात्पुरती जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी प्रभागातील त्यांचे सहकारी हिंगे तसेच अमित गोरखे,नंदा करे आणि कविता जाधव बरोबर होत्या.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT