Not all crimes given to CBI are solved: Chhagan Bhujbal
Not all crimes given to CBI are solved: Chhagan Bhujbal  
मुख्य बातम्या मोबाईल

सीबीआयकडे दिलेले सगळेच गुन्हे सुटतात असे नाही : भुजबळ

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : "केंद्रीय अन्वषेण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आलेल्या सर्व गुन्ह्यांची उकल होते, असे नाही. त्यासाठी संबंधित प्रकरणाच्या मुळाशी जाऊन धागेदोरे शोधावे लागतात. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अद्याप सीबीआयला पूर्ण करता आलेला नाही,' असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात कदाचित काही त्रुटी असतील. पण, न्यायालयाच्या निकालाचा आदर करावा लागतो, असेही भुजबळ म्हणाले. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 19 ऑगस्ट) दिला होता. त्यावरून राज्यात राजकीय गदारोळ उठला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मंत्री भुजबळ यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. 

नाशिकचे पालकमंत्री असलेले भुजबळ म्हणाले की, मुंबई पोलिस दलातील अनेक अधिकारी हे गुप्तचर विभाग (रॉ) आणि केंद्रीय अन्वेषण विभागामध्ये (सीबीआय) काम केलेले आहेत. कुठल्याही गुन्ह्याचा तपास करताना ते तितकेच कॉन्फिडन्स असतात. सुशांतसिंहच्या प्रकरणात ते होते. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह लावणे योग्य नाही. 

मुंबई पोलिसांची तुलना ही स्कॉटलॅंड यार्डच्या पोलिसांसोबत होते. त्यामुळे सुशांतसिंहच्या प्रकरणात तपास करण्यामध्ये मुंबई पोलिस कुठे कमी पडले, असे मला वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयानेही हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश देताना मुंबई पोलिसांची तपासात कुठेही चूक झालेली नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडे बोट दाखविण्याचे कारण नाही, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह लावणाऱ्यांना सुनावले. 

मंत्री भुजबळ पुढे म्हणतात की, सीबीआयला एखादे प्रकरण सोपविल्यावर सगळ्याच गोष्टी स्वच्छ होणार असे नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा सीबीआयला अद्याप छडा लावता आलेला नाही. एखाद्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्याच्या मुळाशी जाऊन धागेदोरे शोधावे लागतात. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यास राज्य सरकारची तयारी असल्याचे सांगितले आहे. तसेच, या प्रकरणी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. 

ते म्हणाले की, "सीबीआयकडे तपास दिला तरी गुन्ह्याची उकल करण्यासाठी स्थानिक पोलिसच काम करत असतात. या गुन्ह्याचा तपास करताना राज्याच्या राजकारणाचा त्यावर परिणाम होऊ नये.' 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT