Owner of the bullock cart will meet Raj Thackeray for the bullock cart race
Owner of the bullock cart will meet Raj Thackeray for the bullock cart race 
मुख्य बातम्या मोबाईल

बैलगाडा शर्यतींसाठी आता राज ठाकरेंना साकडे 

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : बैलगाडा शर्यत ही जुनी परंपरा असून गेली चार वर्षे बंद असलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी, यासाठी ठाणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी लवकरात लवकर व्‍हावी, अशी मागणी हे गाडामालक राज यांना करणार आहेत. (Owner of the bullock cart will meet Raj Thackeray for the bullock cart race)

गावातील जत्रा-यात्रांमध्ये बैलगाडा शर्यत ही आकर्षण असते. घाटात, मैदानात सर्वांत कमी सेकंदात अंतर पार करणारी खिलार बैलजोडी म्हणजे गाडा मालकांची शान असते. पण, सध्या ही बैलगाडा शर्यत बंद असल्याने जत्रा यात्रेतील घाटाची रयाच गेली आहे. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली नसल्याने ही बंदी कायम आहे. राज्यात सध्या बैलगाडा मालक या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांची नुकतीच एक बैठक पार पडली आहे. त्यानंतर त्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेत बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती केली. तसेच, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची यासंदर्भात भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी संदीप माळी, सुनील मुंढे, महेश खोरे, दीपेश पाटील यांसह अनेक बैलगाडा मालक उपस्थित होते. आमदार पाटील यांनी बैलगाडा मालकांची राज ठाकरे यांच्याशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन या वेळी गाडा मालकांना दिले.

बैलगाडा शर्यतीसाठीचा खिलार जातीच्या देशी बैलांचा वापर शेतीकामासाठी केला जात नाही. त्यामुळे बैलगाडा शर्यती बंद झाल्याने खिलार जातीच्या देशी बैलांचा सांभाळ करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. परिणामी या बैलांची कमी दराने विक्री होऊन त्यांची रवानगी अनधिकृतपणे कत्तलखान्यात होत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम खिलार जातीच्या वंशावर होत असून ही जात नष्ट होईल, अशी भीती निर्माण झाली आहे.


बैलगाडा शर्यतीस खेळाचा दर्जा द्यावा

बैलगाडा शर्यत ही कोणत्याही पक्षाची नाही. सर्व आमदारांना भेटून याविषयी निवेदन देणार आहोत. तसेच, राज ठाकरे यांची भेट घेणार आहोत. एक देश एक कायदा हवा. बैलगाडा शर्यत बंदीवरील सुनावणी होऊन त्याला एक खेळाचा दर्जा दिला जावा, अशी मागणी असल्याचे बैलगाडा मालक संदीप माळी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT