lotus with padalakr
lotus with padalakr  
मुख्य बातम्या मोबाईल

पडळकर तुम्ही तरी काय करणार ? दिवसच वाचाळवीरांचे आहेत ! 

प्रकाश पाटील

जो पक्ष सत्तेत असतो. त्या पक्षाच्या नेत्यांना किंवा मंत्र्यांना बोलण्यावर काहीशा मर्यादा येतात. मात्र विरोधी पक्षांना तसे काही बंधन नसते. विधिमंडळाच्या सभागृहात तर विरोधी पक्ष असे आरोप करतात की ते जनतेचे लक्ष वेधून घेत असतात.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कधीही आमदार, खासदार नव्हते. त्यांनी कधीही निवडणूक लढली नाही. ते कधी मंत्री, मुख्यमंत्रीही बनले नाहीत.(मुलगा मुख्यमंत्री, नातू मंत्री बनला हे सोडून द्या). मात्र सरकारचा आणि विरोधकांचा असा काही ते समाचार घेत की जनमत बदलून टाकत. तीच ताकद शरद पवारांकडेही आहे.

महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या दोन नेत्यांमध्ये जशी होती तसा आज एकही नेता महाराष्ट्रात दिसत नाही. जनमताची नाडी ओळखणारे जे काही मोजके नेते होऊन गेले त्यामध्ये काहीप्रमाणात गोपीनाथ मुंडेही होते. 

महाराष्ट्रात भाजप सारख्या पक्षाला सर्वात मोठी अडचण वाटते तीच मुळात श्री. पवार यांची. शिवसेना सोबत असल्याने सत्ता जाणार नाही. पुन्हा मीच येणार ! मीच मुख्यमंत्री होणार हा जो फाजील आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस यांना होता तो नडला. राज्यात फडणविसांच्या काळात ईडीचे जे राजकारण झाले. त्याने भाजपसोडून इतर सर्वच पक्षातील नेत्यांमध्ये अस्वस्थता होती.

2019 मध्ये काय घडले तर चक्क शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस सत्तेवर आली आणि भाजपला लांब ठेवले. अशी सत्ता शरद पवारच आणू शकतात. हे काही लपून राहिले नाही. सत्तेचे स्वप्न भंगल्याने भाजप श्री. पवार यांना लक्ष्य नाही करणार तर कोणाला करणार हाही प्रश्‍नच आहे ! 

हे सांगण्याचे कारण असेही की राजकारणात टीका, आरोप हे होतच असतात. आज फडणवीस आणि चंद्रकांत पाटील कितीही म्हणत असले तरी त्यांच्या काळातही पवार कुटुंबियांना काही कमी लक्ष्य केले नव्हते. हे आज नाकारून कसे चालेल ? ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या सहा महिन्यांत भाजपला विशेषत: फडणवीस आणि चंद्रकांतदादानांही असेच लक्ष्य केले जात आहे.

विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस हे ही सरकारच्या कारभाराचा बुरखा टराटरा फाडत आहेत. त्यातून विरोधी पक्षाची विश्वासर्हता निर्माण होत होती. सरकारला योग्य प्रश्न विचारून फडणवीस यांनी जे कमविले ते गोपीचंद पडळकर यांनी एका शब्दाने गमविले असे म्हणावे लागेल. 

पडळकरांप्रमाणे नेत्यांची जीभ प्रथमच घसरली का ? तर नाही. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार धरणात काय ... का ? म्हणाले, आरआरआबा बलात्काराबाबत काय म्हणाले? "सामना'त" ना. ग. गोरे यांच्या निधनानंतर भोंदूंना श्रद्धांजली कशासाठी ?", "लोकसत्ताचा वेडा संपादक (अरूण टिकेकर )", "वाकड्या तोंडाचा गांधी" अशा एक ना अनेक वादग्रस्त विधानांनी यापूर्वीही राज्यात खळबळ उडाली आहे. वाचाळविरांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. 

शिवराळ भाषेबरोबरच टर उडविणे, निंदा नालस्ती हे सध्याचे राजकारण असले तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ज्या पद्धतीची टीका करीत होते तीही कधीच समर्थनीय नव्हती. राजकारणात सभ्यता ही पाळलीच पाहिजे. शरद पवारांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही कधीही तोल ढळू दिला नाही. त्यांच्यावर कोणी खालच्या दर्जाची टीका केली तरी तू अशी का टीका करतोस म्हणून किंवा त्याच भाषेत उत्तरही दिले नाही. त्यांचे राजकारण म्हणूनच वेगळे.

ज्या माणसाने पन्नास वर्षे राजकारण गाजविले, त्यांच्यावर पोरकट पडळकरांनी केलेली टीकेची तसेतर दखल घेण्याची गरज नव्हती. पण, शेवटी मॉबसायकॉलाजीला कोणी रोखू शकत नाही. पडळकरांनी जे काही अकलेचे तारे तोडले आहेत त्याचे भाजपनेही समर्थन केलेले नाही. अशा वाचाळविरांची संख्या भाजपमध्ये काही कमी नाही. ते देशात सर्वात आघाडीवर असतात. 

एखाद्याला शिव्या घालणे, टिंगलटवाळकी करणे ही अवघड गोष्ट निश्‍चितच नाही. पण टीका अशी केली पाहिजे की त्या टिकेचे कौतुक झाले पाहिजे. पडळकरांनी अशी टीका करायला हवी होती की शरद पवारांनाही दाद द्यायला हवी होती. तसे मात्र झाले नाही. पडळकरांप्रमाणे हल्लीचे नेते अभ्यास करताना दिसत नाही.

सोशल मीडियावर चमकण्यातच धन्यता मानतात. पडळकर मूर्खासारखे बोलले हे खरे आहे पण, त्यांचा निषेध करणाऱ्यांनाही आपण काय बोलतो हे कळले नाही, याला काय म्हणावे ? एकूनच राजकारणाची पातळीच घसरत चालली आहे असे म्हणावे लागेल. 
काही करा पण, चर्चेत राहा ! 

कॉंग्रेसचे दिग्वीजयसिंह, मणिशंकर अय्यर असतील,भाजपचे आमदार राम कदम यांनी तर लग्नासाठी मुलींना उचलण्याची भाषा केली. आता पडळकरांनी तर कहरच केला. हल्लीच्या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत चर्चेत राहण्याची सवय लागली आहे.

काही करायचे पण, आपल्या नावाची चर्चा झाली पाहिजे हा जो काही समज गैरसमज प्रत्येक पक्षातील नेत्यांनी करून घेतला आहे त्यामुळे वाचाळविरांच्या संख्येत भर पडते आहे. 

एक तर चांगले बोलल्यानंतर लोकांनी चांगले म्हटले की प्रसिद्धी सकारात्मक मिळते. जर चांगले बोलता येत नसेल उचल जीभ लाव टाळ्याला यातच नेते धन्यता मानतात.

सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक प्रसिद्धी मिळविण्याकडेच बहुतांशी नेत्यांचा कल दिसून येतो.वाचाळविरांना नको इतकी प्रसिद्धी मिळते. त्यामुळे असले नेते नेहमीच चर्चेत राहतात. खरेतर वाचाळवीर मुर्खाच्या नंदनवनात शोभून दिसतात, सुसंस्कृत समाजात नाही ! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT