मुख्य बातम्या मोबाईल

पंढरपूरातील शक्‍तीप्रदर्शनाची जबाबदारी शिवसेना मंत्र्यांवर 

सरकारनामा ब्युरो

मुंबई :अयोध्येतील राम मंदिरासाठी पंढरपूरातील चंद्रभागा किनारी शिवसेनेतर्फे आरती करण्यात येणार असून राज्यभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते येथे येणार आहेत. पंढरीत करण्यात येणाऱ्या शक्‍तीप्रदर्शनाची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर टाकली आहे. 

येत्या 24 डिसेंबरला पंढरपुरात आरती होणार आहे. ठाकरे हे अयोध्येतील शरयूप्रमाणेच चंद्रभागेच्या तीरावर आरती करणार आहेत. तसेच पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेऊन अयोध्येत राममंदिर बांधण्याची सुबुध्दी सरकारला द्या, असे साकडे विठ्ठलाला घातण्यात येणार आहे. यावेळी मुंबई ते पंढरपूर दरम्यान सुरू करण्यात येणाऱ्या 'विठाई' या नव्या एसटी बस सेवेचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. 

या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल (शनिवारी) शिवसेना भवनात ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना मंत्री आणि प्रमुख पदाधिकार्यांची बैठक झाली. बैठकीत सभेच्या तयारीविषयी चर्चा करण्यात आली. या सभेसाठी शिवसैनिकांसह राज्यभरातील वारकरी येणार आहेत. अनेक वारकरी संघटनांनी स्वत:हून सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. संघटना आणि पक्ष म्हणून आपण दुष्काळग्रस्तांना मदत करतच आहोत. तरीही आपण दुष्काळप्रश्नी सरकारला जागे केले पाहिजे, असे ठाकरे यांनी बैठकीत सांगितल्याचे समजते. 

या बैठकीला शिवसेना नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT