satej Patil-Shoumika Mahadik
satej Patil-Shoumika Mahadik 
मुख्य बातम्या मोबाईल

बावड्याचे पाटील, शिळ्या कढीला किती ऊत आणणार : शौमिका महाडिक यांचा सवाल

सरकारनामा ब्यूरो

कंदलगाव : "गोकुळ'च्या निवडणुकीत पालकमंत्री शिळ्या कढीला ऊत आणत आहेत. त्यांना स्क्रिप्ट लिहून देणाऱ्यांनी आता कन्सेप्ट बदलावी, अशी खरमरीत टीका आज जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केली. महाडिक यांचा पालकमंत्र्यांना इतका अभ्यास आहे, की त्यांना डॉक्‍टरेट दिली पाहिजे. महाडिक यांचा जप बंद करून त्यांनी निवडणुकीवर लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथे झालेल्या सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचार सभा व मेळाव्यात त्या बोलत होत्या.
शौमिका महाडिक म्हणाल्या, "निवडणूक कोणतीही असो वृत्तपत्र उघडताच बावड्याच्या पाटलांचा महाडिकांविषयी जप चालूच असतो. गोकुळची निवडणूक अतितटीची असल्याचे त्यांचे मत चुकीचे असून निकालानंतरच त्यांना त्याची जाणीव होईल. आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी कागल तालुक्‍यातील महालक्ष्मी दूध संघ का बंद पडला आणि त्यांच्याकडे असणाऱ्या कोणत्या सहकारी संस्था व्यवस्थित चालविल्या हे सुद्धा सांगावे.''

महाडिकांनी "गोकुळ'मध्ये टॅंकरच्या माध्यमातून डल्ला मारल्याचा आरोप केला जातो. पण, महाडिक उद्योग समूह अनेक वर्षे कार्यरत असून त्याच्या तीन टक्केही देखील उत्पन्न "गोकुळ'मधून मिळत नाही. प्रत्येक निवडणुकीत महाडिकांना टार्गेट करून बोलणे बंद करावे. या असल्या प्रचाराला कुणीच ठरावधारक बळी पडणार नाहीत. राजर्षी शाहू आघाडीला विजयी करूनच विरोधकांचा डाव ठरावधारक हाणून पाडतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ""ठराव धारकांनी खोट्या आश्वासनांना बळी न पडता आघाडीच्या उमेदवारांना मत द्यावे. कारण एका ठरावधारकांवर अनेक कुटूंबे अवलंबून आहेत. महाडिकांचे व्यवसाय हे कष्टाचे असून त्यांनी कुणाच्या मुंड्या मुरगळून, जमिनी बळकावून आणि डोनेशन लाटून व्यवसाय थाटलेले नाहीत. निवडणुका आल्या की महाडिकांवर आरोप करायचे आणि नंतर पळून जाण्याचा उद्योग आता तरी विरोधकांनी बंद करावा.''
यावेळी अनिल ढवण, प्रतापसिंह पाटील, संपत पाटील, तानाजी पाटील यांचीही भाषणे झाली. विलास बेडगे, रमेश चौगले, बी. डी. किल्लेदार, अर्जुन इंगळे, उदयसिंग पाटील, भिमराव चौगले, एम.आय.चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

मल्टीस्टेटचा ठराव करणारेच एकत्र
गोकुळ मल्टीस्टेट व्हावा, ही इच्छा बोलून दाखवणारे आबाजी सध्या नेत्यांच्या जवळ असल्याने त्यांनी मल्टीस्टेटचा मुद्दा ताणून धरणे चुकीचे आहे. पालकमंत्र्यांनी महाडिकांविषयी न बोलता निवडणूकीवर बोलावे. तसेच गोपाळ दुध डेअरी ही खासगी मालकीची असल्याने त्या डेअरी विषयी न बोलता स्वतःच्या संस्था कशा आहेत, ते सांगावे, असा टोलाही माजी खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला.

पाच लाख चुलीत पाणी.
गोकुळच्या ठरावधारक असणाऱ्या प्रत्येक गावचा विचार केला तर ठरावधारक गावात सुमारे पाच लाख चुली आहेत. प्रत्येक वेळी त्यांना खोटी आश्‍वासने देऊन यापूर्वीही अनेकांचा विश्वासघात केला असल्याने त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम विरोधी नेते करीत असल्याचेही माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT