Sarkarnama (87).jpg
Sarkarnama (87).jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

पोलिसांसाठी गुड न्यूज ; डीजीपी पांडेंनी घेतला महत्वाचा निर्णय

उत्तम कुटे

पिंपरीः पोलिस खात्याला साप्ताहिक सुट्टी आतापर्यंत फक्त नावाला रेकॉर्डपुरतीच होती. कारण त्यादिवशीही त्यांना काम करावे लागत होते. त्याबाबत थोडासा दिलासा संजय पांडे हे राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) झाल्यानंतर मिळाला. त्यांच्यामुळेच हा पूर्ण दिलासा पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना आता मिळणार आहे. कारण साप्ताहिक सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्रगस्त वा २४ तास ड्यूटी लावली जात असल्याने आठवड्याची सुट्टी त्यांना असून नसल्यासारखीच होती. मात्र, आता रजेच्या आदल्या दिवशी असे काम न लावण्याचा आदेश काढून त्यांना साप्ताहिक सुट्टीचा आनंद खऱ्या अर्थाने देण्याचा निर्णय़ डीजीपी पांडे यांनी नुकताच (ता. ८) घेतला आहे. त्याचे पोलिस दलातून उत्स्फूर्त स्वागत झाले आहे. त्यातही १२ तासांपेक्षा अधिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याबद्दल मोठा आनंद  व्यक्त केला आहे. 

पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्टीचे योग्य नियोजन करण्याचा आदेश पांडे यांनी बुधवारी (ता ८) काढला. त्यामुळे पोलिसांना शारिरीक व मानसिकही दिलासा मिळणार आहे. नुकतीच त्यांनी महिला पोलिसांना आठ तासांची ड्यूटी लावण्याचा प्रयोग पुणे ग्रामीण आणि नागपूरमध्ये प्रायोगिक तत्वावर अंमलात आणला आहे. भविष्यात मनुष्यबळ उपलब्ध होताच संपूर्ण खात्यात तो लागू करण्याचा त्यांचा मानस आहे. दरम्यान, त्यांच्यामुळेच २४ तासांची पोलिसांचे ड्यूटी अवर्स निम्यावर आले आहेत. फक्त साडेचार महिन्यात त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. पोलिस कल्याणाचे अनेक निर्णय घेतल्याने खाकी त्यांना देवमाणूस मानू लागली आहेत.अनेक कुटुंबांनी त्यांची प्रतिमा देवासारखी घरात ठेवली आहे. 

पिंपरी पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप-राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरु
साप्ताहिक सुट्टीच्या अगोदरच्या दिवशी पोलिसांना रात्रगस्त वा २४ तास मानसिक व शारिरीक तणावाचे काम लावले जात  होते. अशा कामातून आलेल्या थकव्यामुळे त्यांच्या साप्ताहिक सुट्टीचा उद्देश व्यर्थ ठरत असल्याचे पांडे यांना दिसून आले.  ही बाब विचारात घेऊन पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टीच्या आदल्या दिवसाच्या कामाचे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधिक्षक आणि एसआरपी कमांडंट यांना आता सांगितले आहे. त्यामुळे या रजेच्या आदल्या दिवशी थकव्याचे तसेच ही रजा वायाच जाईल, असे काम आता पोलिसांना दिले जाणार नाही.त्यामुळे कर्मचाऱ्यांत मोठ्या समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT