PM narendra Modi comments on seven years of government in man ki baat
PM narendra Modi comments on seven years of government in man ki baat 
मुख्य बातम्या मोबाईल

मोदी सरकारची सात वर्ष अन् सात दशकांच्या सत्तेवर बोट...पंतप्रधानांची 'मन की बात'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 30) 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. कोरोनाच्या स्थितीसह मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मागील सात वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामगिरीचाही उल्लेख केला. हे करताना त्यांनी मागील सात दशकांतील सत्ताकाळाचाही उल्लेख केला. यावेळी त्यांनी ऑक्सीजन टँकर चालक, रेल्वे लोको पायलट, ग्रुप कॅप्टन आदींशी संवाद साधला. (PM narendra Modi comments on seven years of government in man ki baat)

पंतप्रधान मोदी म्हणाले, अनेक गावांतील लोक देशाला धन्यवाद देत आहेत. मागील 70 वर्षांनंतर गावांत पहिल्यांदाच वीज पोहचत आहे. त्यांची मुलं उजेडात, पंख्याखाली बसून अभ्यास करत आहेत. काहींना बँकेत खाते खोलता आले याचा आनंद आहे. विविध योजनांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांच्या आनंदात मलाही सहभागी करून घेत आहेत. एका आदिवासी भागात रस्त्याचे काम झाल्यानंतर मला त्यांनी संदेश पाठवून पहिल्यांदाच जगाशी जोडलो गेल्याचा आनंद व्यक्त केला होता. पंतप्रधान आवास योजनेत घर मिळाल्यानंतर गृहप्रवेशासाठी अनेकांचे निमंत्रण मिळत आहे. या सात वर्षांत सर्वांच्या कोट्यवधी आनंदात मी सहभागी झालो आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. 

सबका साथ, सबका विकास या मंत्रावर देश चालत असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले, मागील सात वर्षात आपण जे काही कमवले ते देशाचे आहे. राष्ट्रीय गौवरवाचे अनेक क्षण आपण एकत्रितपणे अनुभवले. पंतप्रधान म्हणून मी जेव्हा पाहतो की, आता भारत दुसऱ्या देशांचे विचार आणि दबावाखाली नाही, आपल्या संकल्पावर चालत आहे, तेव्हा प्रत्येकाला गर्व होतो. आपल्याविरोधात कटकारस्थान रचनाऱ्यांना जेव्हा भारत सडेतोड उत्तर देतो तेव्हा आत्मविश्वास आणकी वाढतो. 

जुने विवाद शांततेत सोडवले

स्वातंत्र्यानंतर सात दशकांत आपल्या देशांत केवळ साडे तीन कोटी ग्रामीण घरांमध्ये पाण्याची नळजोडणी दिली गेली. पण मागील 21 महिन्यांतच साडे चार कोटी घरांना नळजोळ मिळाला आहे. यातील 15 महिने तर कोरोनाचा काळ होता. आयुष्यमान योजनेमुळे देशात नवीन विश्वास निर्माण झाला आहे. डिजिटल व्यवहार वाढले असून कोरोना काळात त्याचा खूप फायदा झाला. पूर्वोत्तर राज्यांपासून काश्मीरपर्यंत शांती आणि विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. देशातील अनेक जुने विवादही शांततेत सोडवण्यात आले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

ऑक्सीजन उत्पादनात दहा पटीने वाढ

कोरोना स्थितीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, 'कोरोनापूर्वी देशात एक ादिवसांत 900 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सीजनचे उत्पादन होत होते. आता हे प्रमाण दहापटीने वाढले आहे. सध्या जवळपास 9500 मेट्रिक टन उत्पादन होत आहे. टीम इंडिया बनून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले आहे.' पंतप्रधानांनी कार्यक्रमादरम्यान ऑक्सीजन टँकर चालक, ऑक्सीजन एक्सप्रेस लोको पायलट, हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कामाचेही कौतुक केले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT