Vikas Dubey's Aide Killed in Encounter
Vikas Dubey's Aide Killed in Encounter 
मुख्य बातम्या मोबाईल

विकास दुबेचा साथीदार चकमकीत ठार

वृत्तसंस्था

लखनौ : पकडायला आलेल्या आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुन्हेगार विकास दुबेचा जवळचा साथीदार अमर दुबे आज पहाटे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. अमर हा देखिल आठ पोलिसांच्या हत्या प्रकरणात सहभागी होता. दरम्यान, विकास दुबे हा दिल्ली - हरयाणाच्या सीमेवरील एका हाॅटेलात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

पोलिसांनी अमरला ठार केल्याचे उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने हमीरपूर येथे अमर दुबेला पकडाचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो ठार झाला. या चकमकीत एक पोलिस इन्स्पेक्टर व एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. दरम्यान विकास दुबे हा बिजनोर येथे आपल्या एका साथीदारासह एका मोटारीत दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे उत्तराखंड पोलिसांनी दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या चकमकीनंतर विकास दुबेचा साथीदार शामू वाजपेयी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर २५ हजार रुपयांचे ईनाम आहे.

कानपूरमधील बिकरु गावात २ जूनच्या रात्री विकास दुबे व त्याच्या साथीदारांनी एका पोलिस अधिकाऱ्यासह आठ पोलिसांची हत्या केली. त्यानंतर तो फरारी झाला आहे. या घटनेनंतर काल सायंकाळी कानपूरच्या चौबेपूर पोलिस ठाण्याच्या ६८ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. 

विकास दुबेवर उत्तर प्रदेश पोलिसांनी अडीच लाख रुपयांचे ईनाम जाहीर केले आहे. त्याचे छायाचित्र असलेली पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. दरम्यान, विकास दुबे दिल्लीजवळ एका हाॅटेलात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या हाॅटेलातून काल दुपारी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. विकास दुबे पोलिस येण्याच्या काही वेळापूर्वीच तेथून निसटला, अशी माहिती या दोन जणांनी पोलिसांना दिली. 

संपादन- अमित गोळवलकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT