Jagtap and borate.jpg
Jagtap and borate.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

लसीकरणावरून राजकीय वाद ! तीन पक्षाचे नेते एकाच वेळी आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात

सरकारनामा ब्युरो

नगर : शहरातील लसीकरण प्रक्रियेत नागरिकांना लस (Corona) मिळत नाही. या प्रश्‍नावर नागरिक लसीकरण केंद्रांवर आक्रमक झाल्याचे रोजच दिसून येत आहे. अशा स्थितीत लसीकरणासंदर्भातील नागरी प्रश्‍न घेऊन आज महापालिकेच्या जुन्या कार्यालयात तीन राजकीय पक्षांचे नेते एकाच वेळी आले. (Political controversy over vaccination! The three leaders were in the health officer's office at the same time)

यात दोन राजकीय नेत्यांत शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा होती. त्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी आज सकाळी शहरातील बालरोगतज्ज्ञांची बैठक घेतली. यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेने व शहरातील वैद्यकीय यंत्रणेने काय उपाययोजना कराव्यात, 18 वर्षांखालील नागरिकांना लसीकरण करण्यात यावे का, आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

शहरातील लसीकरण व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी निवेदन तयार केले. ते घेऊन ते जुन्या महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे गेले होते. त्याआधीच शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे माळीवाडा आरोग्य केंद्रातील लसीकरण प्रक्रियेतील समस्यांचे निवेदन घेऊन डॉ. बोरगे यांच्यासमोर बसले होते. त्याच वेळी आमदार जगताप आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे पोचले.

या वेळी लसीकरणाबाबत आरोप होऊन राजकीय शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळ तो चालल्यानंतर कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आपल्या कार्यकर्त्यांसह लसीकरणासंदर्भात निवेदन देण्यासाठी आले. त्यांनी पोलिस प्रशासनाला पाचारण केले. पोलिसांच्या मध्यस्थीने वादावर पडदा पडल्याची चर्चा आज नगर शहरात होती. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कोणीही तक्रार दाखल केलेली नव्हती. 

मी लसीकरणाच्या प्रश्‍नावर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मात्र, या वेळी माझा कोणाशीही वाद झाला नाही. काही जण मुद्दाम स्टंटबाजी करीत आहेत. 
- आमदार संग्राम जगताप 

मी माळीवाडा येथील आरोग्य केंद्रांत सामान्य नागरिकांना लस मिळत नसल्याच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी निवेदन घेऊन महापालिकेत गेलो होतो. त्यावेळी आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांच्या जमावासह तेथे आले होते. त्यावेळी लसीकरणावरून आमच्यात शाब्दिक वाद झाला. 
- बाळासाहेब बोराटे, शिवसेना नगरसेवक 

शहरातील लसीकरणप्रश्‍नी मी काही कार्यकर्त्यांसह वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांच्या दालनात नगरसेवक बाळासाहेब बोराटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे व आमदार संग्राम जगताप यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. संबंधितांमध्ये वाद सुरू होता म्हणून मी पोलिसांना बोलावून घेतले. 
- किरण काळे, शहर जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस 

माझ्या दालनात कोणत्याही स्वरूपाचा वाद झालेला नाही. 
- डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका, नगर 

हेही वाचा...

Edited By  - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT