Prakash Mehta
Prakash Mehta  
मुख्य बातम्या मोबाईल

देवेंद्रजी, शासनाला आता तुम्हीच 'मार्गदर्शन' करा !

सरकारनामा ब्यूरो

मुंबई :  महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक चांगलाच वाढला असून राज्य लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. पुणे, मुंबईसह, नागपूरमधील परिस्थिती तर गंभीर बनली असून या तिन्ही शहरात प्रत्येकी दररोज सरासरी एक हजारच्या पुढे कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून देवेंद्रजी आपणच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा, अशी विनंती केली आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती सुरु असून कित्येक जणांचं संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित आहे. तर बहुतांश कुटुंबाची कुटुंबे रुग्णालयात आहेत. हे सगळं वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी विनंती फेसबुक पोस्ट लिहून प्रकाश मेहता यांनी देवेंद्र फडणवीस यांना साद घातली आहे. 

'देवेंद्रजी सप्रेम नमस्कार…कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढला आहे. घाटकोपरमध्ये आज सर्वाधिक 327 रूग्ण पॉजिटिव्ह निघाले आहेत. स्थानिक रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जागा रिकाम्या नाहीत. परत पूर्ण लॉकडाऊन करायची वेळ येणार आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तर कित्येकांचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित असून एकाच रुग्णालयात उपचार घेताना आधळून येत आहेत', अशी फेसबुक पोस्ट प्रकाश मेहता यांनी गुरूवारी रात्री उशिरा टाकली. पती, पत्नी, मुलगा, सून एकाच रुग्णालयात पण वेगवेगळ्या वॉर्डमध्ये दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे हे सगळे वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे, तुमच्या अनुभवाचा शासनाला फायदा व्हावा, याकरिता मी तुम्हाला साद घालतो, असेही मेहता यांनी नमूद केले.

दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात 35 हजार 952 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. गुरुवारी दिवसभरात 20 हजार 444 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले, तर दिवसभरात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण 2 लाख 62 हजार 685 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे. आतापर्यंत एकूण 22 लाख 83 हजार 037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 13 लाख 62 हजार 899 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 13 हजार 770 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT