Kirit Somaiya, Pratap Saranaik .jpg
Kirit Somaiya, Pratap Saranaik .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

किरीट सोमय्या अडचणीत...सरनाईकांनी केला 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विविध आरोप केले होते. सोमय्या यांनी खोट्या विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असे सरनाईक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार सोमय्या यांच्या विरोधात, ठाणे न्यालयात १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा सरनाईक यांनी दाखल केला आहे. रीतसर प्रक्रिया करून हा दावा नुकताच दाखल केला आहे. त्यामुळे सोमय्या यांना आता त्यांनी केलेल्या आरोपांबाबत न्यायालयात उत्तर द्यावे लागणार आहे. (Pratap Saranaik files defamation suit against Kirit Somaiya for Rs 100 crore) 

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास करून युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा किरीट सोमय्या यांनी त्यांचे पती भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या यांच्या राजकीय शक्तीचा वापर करून तब्बल १६ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात केले आहे. यामध्ये पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक करून खोटी कागदपत्रे सादर करून अनधिकृत शौचालयांची बिलेही वसूल केली आहेत, असा आरोप सनाईक यांनी केली आहे. याप्रकरणी सोमय्या पती-पत्नींवरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती. 

मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे ही मागणी होती. याप्रकरणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर महापालिकेकडून अहवाल मागवला होता व पालिकेने तो अहवाल शासनाला सादर केला होता. त्या अहवालात पर्यावरणाचा ऱ्हास करून शौचालयांचे बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवले होते व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. सोमय्या यांचा शौचालय घोटाळा बाहेर निघाल्यानेच त्यांनी खोटे आरोप केले असे, सरनाईक म्हणाले होते.  

सोमय्या यांनी ठाण्यात येऊन सरनाईक यांच्या विरोधात विविध आरोप केले होते. त्याच बरोबर सरनाईक यांच्या विरोधात बदनामी करणारे बॅनरही लावले होते. केंद्र व राज्य सरकारच्या संघर्षात महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार म्हणून केवळ राजकीय हेतूने, सरनाईक यांना बदनाम करण्यासाठी सोमय्या आरोप करीत आहेत असा आरोप करण्यात येत होता. सोमय्या यांनी ठाण्यामध्ये सरनाईक यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर आरोप केले होते.

त्यावेळी किरिट सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी जाहीर केले होते. तशी नोटीस सरनाईक यांनी सोमय्या यांना पाठवली होती. त्याच बरोबर बदनामी केली म्हणून माफी मागा असे नोटिशीत म्हटले होते. सरनाईक यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या नोटिशीला सोमय्या यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे बोलल्याप्रमाणे सरनाईक यांनी १०० कोटींचा दावा सोमय्यांच्या विरोधात दाखल केला आहे. त्यासाठी न्यायालयात ३ लाख इतकी स्टॅम्पड्युटी भरली आहे. (Pratap Saranaik files defamation suit against Kirit Somaiya for Rs 100 crore) 

किरिट सोमय्या यांनी राजकीय द्वेषाची पातळी ओलांडून घाणेरडे राजकारण केले आहे. बेलगाम खोटी विधाने करून बदनामीची मोहीम सुरु केली. सोमय्या यांनी गेल्या ६ महिन्यात वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत खोटी वक्तव्ये व बदनामी केली. त्यांनी जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला. खोटी विधाने आणि बातम्यांमुळे माझ्या प्रतिमेला जो तडा गेला, माझ्या इभ्रतीला जे नुकसान पोहोचले. त्या नुकसान भरपाईपोटी मी विशेष दिवाणी दावा दाखल केलेला आहे व दिवाणी दाव्याचे मूल्य रक्कम १०० कोटी इतके आकारलेले असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT