pune congress house attack analysis
pune congress house attack analysis 
मुख्य बातम्या मोबाईल

विश्वजित कदमांची शिफारस केल्यानेच काँग्रेस भवनावर हल्ला?

सरकारनामा ब्युरो

पुणे: येथील काँग्रेस कमिटीने मंत्रीपदासाठी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्याऐवजी कडेगाव पलूसचे आमदार विश्वजित कदम यांची शिफारस केल्याने काँग्रेस भवनावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विस्तार 30 डिसेंबरला पार पडला. या विस्तारावेळी पुणे जिल्ह्यातील भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना स्थान  मिळेल, अशी ठोस अपेक्षा होती. थोपटे हे लागोपाठ तिसऱ्यांदा आमदार झाले असून कठीण परिस्थितीतही त्यांनी काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. हे पाहता पक्ष मंत्रीपद देईल  या खात्रीने थोपटे समर्थक विस्ताराच्या दिवशी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते, मात्र निम्म्या रस्त्यातच त्यांना मंत्रीपद मिळणार नसल्याचे समजले. त्यामुळे निराश अंतकरणाने ते परतले. दुसऱ्या दिवशी या नाराजीची प्रतिक्रिया पुण्यात उमटली. 30-35 थोपटे समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनात जोरदार तोडफोड केली. 

या घटनेनंतर तोडफोड योग्य की अयोग्य यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत, मात्र नेमके कारण समोर आलेले नाही. काँग्रेस पक्षाने संग्राम थोपटे यांच्याबाबत अत्यंत नरमाईची भुमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संग्राम यांचा सन्मान करण्याची घोषणा केली आहे. या वक्तव्याचा रोख पाहता थोरात हे थोपटे समर्थकांचा राग शांत करू पाहत आहेत. यापार्श्वभुमीवर थोपटेंना एवढा राग कां आला, या प्रश्नाची चर्चा सुरू झाली आहे. त्यात पुणे काँग्रेस कमिटीने थोपटे यांना डावलल्याचा मुद्दा पुढे आला आहे. काँग्रेस कमिटीने मंत्रीपदासाठी संग्राम थोपटे यांच्याऐवजी सांगली जिल्ह्याच्या कडेगाव पलूसचे आमदार विश्वजित कदम यांची शिफारस केल्याचे समजल्याने थोपटे समर्थक संतप्त झाले.पुणे जिल्हयातील आमदार सोडून सांगली जिल्ह्यातील आमदाराची शिफारस करण्याचे कारण काय? या प्रश्नाचे नेमके उत्तर त्यांना न मिळाल्याने त्यांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT