मुख्य बातम्या मोबाईल

दूध धंदा नासवणाऱ्यांवर किटलीचे ठोके घालणारा 'बबन' काळजाला भिडतो! 

भाऊराव कऱ्हाडे आणि भाऊसाहेब शिंदे या दोन शेतकऱ्यांच्या पोरांनी चित्रपटाचा एक नवा फॉर्म आणलाय. भाषेपासून मांडणीपर्यंत सगळं नवं आहे. ते काहींना झेपणार नसलं तरी लाखो लोकांच्या काळजाला भिडणार आणि आपलं वाटणार आहे.

संपत मोरे

भाऊराव कऱ्हाडे निर्मित "बबन' हा मराठी चित्रपट सध्या गाजतोय. ख्वाडा या चित्रपटानंतर भाऊराव बबन घेऊन आले आहेत. बबनचे कथानक खेड्यातले आहे. अलीकडच्या काळातील गावगाडयाचं वास्तव चित्रण "बबन'मधून होतंय. खेड्यातील कोणत्याही माणसाने हा चित्रपट पाहिला तर त्याच्या समोर गावातील पात्रे उभा राहतात. बबनचं गाव हे त्याला आपलं गाव वाटू लागतं आणि त्याच्या गावातील बबन कोण? हे सुद्धा त्याला कळतं. एवढी किमया "बबन'ने साधली आहे. 

बबन हा सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा दुधाला दर मिळत नाही म्हणून थेट कंपनीला दूध घालतो. आपल्या कष्टाचे योग्य पैसे मिळावेत हीच त्याची इच्छा असते. त्यापलीकडे त्याला कोणत्याही राजकारणात पडायचे नसते. पण बबन आपल्याकडे दूध घालत नाही, याचा राग आलेला चेअरमन त्याच्या मार्गात काटे पेरतो, त्याला कर्ज मिळून देत नाही. चेअरमनचा पोरगा त्याला मारहाण करतो. दूध वाहून नेण्यासाठी घेतलेली गाडी फोडून टाकतो. गरिबाच्या उत्पादनाची साधने नष्ट करून त्याला दुबळा बनवण्याचा श्रीमंती अरेरावी यातून दिसते. चेअरमन, त्याच्या मुलाने अडचणी निर्माण करायच्या आणि बबनने त्यावर मार्ग काढायचा, अशी या चित्रपटाची मांडणी आहे. गावटगे सामान्य माणसाला किती छळतात, त्याला नाडतात हे पाहून चीड येते. 

बबन हा बैजू पाटील यांचा मुलगा आहे. पण बैजू पाटील हे दारुडे आहेत, दारूच्या व्यसनात त्यांची जमीनही गेली आहे. गावात पत नाही. बापाच्या दारूमुळे आईला, आजीला जो त्रास झाला याची जाणीव बबनला आहे म्हणून तो कॉलेज शिकत असतानाच दुधाचा व्यवसाय करतो, कुटुंबाला आधार होतो. बबन अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाचा प्रतिनिधित्व करतो. तो कष्टाळू आहे. आई, आजी राबराब कष्ट करतात त्या कष्टाचं चीज व्हावं अशी त्याची इच्छा म्हणूनच तो दोन रुपये जादा मिळावेत म्हणून डेअरी बदलतो आणि त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागतं. चेअरमन त्याला गावगुंडीचा हिसका दाखवतो. इतका त्रास देतो की बबनला एका क्षणी रडू कोसळतो, तो ढसाढसा रडतो. 

गावातील राजकारण आणि नाडला जाणारा गरीब माणूस हे सूत्र "बबन'ने मांडलं आहे. बबन मध्ये एक प्रेमकहाणी आहे. बबनसारख्या गरीब पोराने सुंदर पोरीवर प्रेम करावं ही गोष्ट चेअरमनचा मुलगा आणि त्याच्या गॅंगला सहन होत नाही. गरीब तरुण आणि गाव पुढारी यांचा वर्गीय संघर्ष ठळकपणे बबनमध्ये दिसतो. 

बबनची भूमिका भाऊसाहेब शिंदे या श्रीगोंदाजवळच्या हिंगणी गावाच्या तरुण कलाकारांने केली आहे. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने बबन त्यानी समर्थपणे साकारली आहे.यापूर्वी ख्वाडातही त्याची भूमिका गाजली होती. बबनची खास भाषाही मनाला भिडते. भाऊराव कऱ्हाडे यांनी बैजू पाटील यांची भूमिका साकारून एक गावगाड्यातील माणूस उभा केलाय. त्याचा सवांद अनेकदा खळखळून हसवतो. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT