Raj Thackeray
Raj Thackeray 
मुख्य बातम्या मोबाईल

राज ठाकरे म्हणतात...तर निवडणुका पुढे ढकला!

सरकारनामा ब्युरो

मुंबई  : सरकार शिवजयंतीला, मराठी भाषा दिन सोहळ्यांना नकार देते; मात्र सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारमधील मंत्री सगळ्या कार्यक्रमांमध्ये धुडगूस घालू शकतात. एवढेच कोरोनाचे संकट समोर येत असेल, तर जाहीर केल्या जाणाऱ्या सर्व निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही मनसेकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानिमित्त मनसेने दादरमध्ये स्वाक्षरी मोहिमेचा कार्यक्रम राबवला. या कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. या वेळी राज ठाकरे यांनी आपल्या तोंडावर मास्क न घालता सहभाग घेतला. याचसंदर्भात त्यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले.

दादरमध्ये मनसेने आयोजित केलेल्या मराठी स्वाक्षरी मोहिमेसाठी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. राज ठाकरेंनी मोहिमेच्या फलकावर स्वाक्षरी करत या मोहिमेला सुरुवात केली. परवानगी नसताना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याबाबत प्रश्‍न विचारला असता राज यांनी सांगितले, की बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते; मग अशाच कार्यक्रमांना परवानगी का नाकारली जाते.
मनसेकडून मराठी भाषा दिनानिमित्ताने दरवर्षी कार्यक्रम घेतले जातात. या वर्षी खुद्द राज ठाकरेंनी जाहीर पत्राद्वारे 'स्वाक्षरी मोहिमे'चे आवाहन केले. त्यानंतर दादरमध्ये स्वाक्षरीची मोहीम घेण्यात आली. या कार्यक्रमाला अमेय खोपकर, अवधुत गुप्ते, सायली शिंदेसहीत अनेक मराठी कलाकार उपस्थित होते.

उदयनराजे राज ठाकरेंच्या भेटीला
दरम्यान, भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे भोसले सध्या राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. राज ठाकरे यांची भेटदेखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. उदयनराजे यांची कृष्णकुंजवरील ही पहिलीच भेट होती. या वेळी उदयनराजे यांनी राज यांना राजमुद्रा, तसेच मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिकाही दिली. याआधी उदयनराजे यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते; मात्र या भेटी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर होत्या हे स्पष्ट झाले होते. राज ठाकरे यांची भेटदेखील याच मुद्द्यावर झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT