rajasthan chief minister ashok gehlot shifted congress mals to jaisalmer
rajasthan chief minister ashok gehlot shifted congress mals to jaisalmer  
मुख्य बातम्या मोबाईल

गेहलोत म्हणतात, आमदारांना त्रास दिला जात असल्याने जैसलमेरला हलवले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. यातच विधानसभा अधिवेशन बोलावण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात जुंपली होती. अखेर राज्यपालांनी अधिवेशन बोलावण्यास होकार दिला आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. आता गेहलोत यांनी विमानाने आमदारांना दुसरीकडे हलविले आहे. 

मंत्रिमंडळाने अधिवेशन बोलावण्यासाठी पाठविलेला पहिला प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाने दुसरा प्रस्ताव पाठविला होता. याला राज्यपालांनी उत्तर देऊन त्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर तिसरा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला होता. राज्यपालांनी तिसऱ्या प्रस्तावालासुद्धा नकारघंटा कायम ठेवली होती. त्या प्रस्तावातही राज्यपालांनी त्रुटी काढल्या होत्या. राज्य सरकारने तातडीने अधिवेशन बोलावण्यासाठी कोणतेही कारण दिलेले नाही. कोणतेही कारण दिलेले नसेल तर २१ दिवस पूर्वसूचना देऊन अधिवेशन बोलवता येईल, असे राज्यपालांनी म्हटले होते. 

यानंतर गेहलोत यांनी बुधवारी (ता.29) राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर गेहलोत यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत चर्चा करुन अखेर चौथ्यांदा राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्यपालांनी मान्य केला. विधानसभा अधिवेशन १४ ऑगस्टपासून बोलावण्यास राज्यपालांनी मान्यता दिली आहे. याचबरोबर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अधिवेशनादरम्यान सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 

आता विधानसभा अधिवेशन होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेहलोत सरकारसाठी हे अधिवेशन कसोटीचे तर पायलट यांच्यासाठी अस्तित्वाचे ठरणार आहे. यामुळे गेहलोत हे फार खबरदारी घेत आहेत. त्यांनी आधी काँग्रेस आमदारांना जयपूरमधील हॉटेल फेअरमाँटमध्ये ठेवले होते. आज सकाळी हे आमदार जयपूर विमानतळावर नेण्यात आले. तेथून त्यांना चार्टर्ड विमानाने जैसलमेरला हलविण्यात आले आहे. जैसलमेरमधील सूर्यगड हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यात आले आहे. 

याविषयी बोलताना गेहलोत म्हणाले की, आमचे आमदार अनेक दिवस जयपूरमधील हॉटेलमध्ये होते. त्यांचा येथे मानसिक छळ होऊ लागला आहे. कोणत्याही बाह्य दबावापासून वाचविण्यासाठी आम्ही त्यांनी दुसरीकडे हलवत आहोत. याआधी आमच्या आमदारांना पैशाचे आमिष दाखविण्यात आले होते. अशा प्रकारचा घोडेबाजार होत असेल तर देशाचे पुढे काय होईल? 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT