Ramchandra Bhosale arrested for making fake resolution as a society representative
Ramchandra Bhosale arrested for making fake resolution as a society representative  
मुख्य बातम्या मोबाईल

सोसायटी प्रतिनिधीचा मोह नडला; जेलचा पाहुणचार घडला

संगीता भापकर

मोरगाव (जि. पुणे) : बारामती तालुक्यातील तरडोली येथील हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीशी कोणताही संबंध नसताना येथील रामचंद्र विठ्ठल भोसले याने खोटे शिक्के, बनावट लेटरपॅड, खोट्या सह्या करून सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोसायटी प्रतिनिधी म्हणून स्वतःच्या नावाचा खोटा ठराव केला. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी रामचंद्र भोसले याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

दरम्यान २००९ च्या कर्जमाफीच्या वेळी याच भोसले याने कर्जमाफीची रक्कम ढापून शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. आता खोटा ठराव करून खुद्द सोसायटीलाच फसविले आहे. (Ramchandra Bhosale arrested for making fake resolution as a society representative)  
 
या संदर्भात हनुमान सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप धायगुडे यांनी वडगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वास्तविक 2019 मध्ये धायगुडे यांच्या नावाचा ठराव संबंधित संस्थेने सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी म्हणून पाठविला होता. मात्र, प्रत्यक्षात मतदार यादीत तरडोली येथील रामचंद्र भोसले याचे नाव आले.

संस्थेचे अध्यक्ष धायगुडे आणि संचालक मंडळासह सोमेश्वर कारखाना आणि प्रादेशिक सहसंचालक साखर विभाग, पुणे यांच्याकडे धाव घेत चुकीच्या आलेल्या नावाबाबत चौकशी केली. त्यावेळी भोसले याने स्वतःच्या नावाचा खोटे शिक्के, बनावट लेटरपॅड, खोट्या सह्या करून स्वतःच्या नावाचा प्रतिनिधी म्हणून शिफारस असलेला ठराव कारखान्यासह पुढील यंत्रणेकडे जोडला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 

दरम्यान, धायगुडे यांच्या नावाचा ठराव नेमका कोणी, कुठे आणि कसा गहाळ केला, हे गुलदस्त्यातच आहे. कारखान्याने भोसले याचा ठराव खरा समजून त्याच्या नावाचा समावेश मतदार यादीत केला. भोसले याने फिर्यादीसह, हनुमान विकास संस्था, सोमेश्वर साखर कारखाना आणि प्रादेशिक सहसंचालक साखर विभाग पुणे यांची एकावेळी फसवणूक केली आहे. यामुळे धायगुडे यांचा कारखाना निवडणुकीसाठी मतदान करण्याचा हक्कही हिरावून घेतला आहे. 

कर्जमाफीच्या रकमेचा अपहारही केला 

दरम्यान, रामचंद्र भोसले हा 2009 मध्ये कर्जमाफी काळात हनुमान विकास संस्थेचे सचिव म्हणून काम करीत होता. त्यावेळी कर्जमाफी मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांकडून कर्जाची रक्कम वसूल करून ती बँकेत न भरता त्याचा अपहार भोसले याने केला होता. शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात धाव घेतली होती. त्या प्रकरणात खुद्द पवार यांनी भोसले याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानंतरही पुन्हा याच संस्थेची भोसले याने वैयक्तीक स्वार्थासाठी खोटा ठराव करून केलेली फसवणूक तालुक्यात मोठा चर्चेचा विषय झाला आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे फौजदार सलीम शेख तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT