ramdas athwale unhappy with protocol
ramdas athwale unhappy with protocol  
मुख्य बातम्या मोबाईल

रामदास आठवले या कारणासाठी मुख्यमंत्री ठाकरेंवर नाराज...लिहिले खरमरीत पत्र

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांना  शेवटच्या रांगेत आसनव्यवस्था देऊन  राजशिष्टाचार न पाळल्याचा प्रकार घडला. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करणारे पत्र आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा नाही. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणे नैतिक दृष्टीने योग्य असल्याने तसेच या शपथविधी सोहळ्याचे रितसर निमंत्रण आपणास प्राप्त झाल्याने आपण या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहिलो, असे आठवले यांनी म्हटले आहे.

``नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यक्तीशः आमचे चांगले मित्र आहेत. शिवशक्ती- भीमशक्ती महायुती आम्ही एकत्र केली. त्यातून राज्यात सत्तांतर घडले. तसेच मुंबई महापालिकेत ही शिवसेनेची सत्ता अबाधित राहिली. या एकजुटीमुळे  आमची मैत्री घनिष्ठ झाली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला उपस्थित राहून त्यांचे  रिपाइंतर्फे हस्तांदोलन करून अभिनदंन केले . मात्र केंद्रिय राज्यमंत्री म्हणून राजशिष्टाचार धोरणानुसार आपणास पुढील रांगेत आसनव्यवस्था देणे क्रमप्राप्त होते. या शपथविधी सोहळ्यात राजशिष्टाचार न पाळता केंद्रिय राज्यमंत्री पदावर असतानाही आपणास मागील रांगेत बसविण्यात आले, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

या शपथविधी सोहळ्यास महत्वाच्या व्यक्तींना प्रवेशद्वार क्रमांक दोनने प्रवेश दिला जात असताना केंद्रिय राज्यमंत्री म्हणून माझ्या वाहनाला प्रवेशद्वार क्रमांक सातने प्रवेश दिल्याने राजशिष्टाचार मोडण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही लक्ष द्यायला  पाहीजे होते, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त करत  नाराजी मांडली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT