RanjitShinh Mohite Patil will face Dhawalshinh mohite patil for Akluj Gram Panchayat
RanjitShinh Mohite Patil will face Dhawalshinh mohite patil for Akluj Gram Panchayat  
मुख्य बातम्या मोबाईल

अकलूजमध्ये धवलसिंह विरोध रणजितसिंह पुन्हा सामना रंगणार 

सुनील राऊत

नातेपुते (जि. सोलापूर) : माळशिरस तालुक्‍याचे राजकारण हे मोहिते-पाटील यांच्याभोवती कायम फिरत राहते. मग, ती विधानसभेची निवडणूक असो अथवा ग्रामपंचायतीची. मोहिते पाटील कुटुंबीय कायम चर्चेत असते. आताही ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात आमदार रणजितसिंह, धैर्यशील मोहिते पाटील आणि इतर सर्व नेतेमंडळी अशी लढत होत आहे. एक जागा बिनविरोध करत धवलसिंह यांनी विजयाचे खाते उघडले आहे. मात्र, ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात येते का? हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. 

अकलूज ग्रामपंचायतीच्या 17 जागांपैकी एका जागेवर लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील पॅनेलच्या उमेदवार तथा धवलासिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी उर्वशीराजे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 16 जागांसाठी 47 उमेदवार रिंगणात आहेत. मोहिते पाटीलविरूद्ध मोहिते-पाटील असा दुरंगी सामना होत असल्याने येथील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

अकलूजमध्ये सहकार महर्षी (कै.) शंकरराव मोहिते-पाटील व विजयसिंह मोहिते-पाटील यांचे विकास पॅनेल विरोधात लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील परिवर्तन पॅनेल यांच्यात ग्रामपंचायतीसाठी लढत होत आहे. सत्तेत असलेल्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील विकास पॅनेलचे उर्वरित सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदार रणजितसिंह, धैर्यशील आणि इतर सर्व नेते व कार्यकर्ते झटत आहेत. तर, धवलसिंह यांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, हिंदुराव माने पाटील, माजी आमदार बाबूराव देशमुख यांचे सुपुत्र पांडुरंग देशमुख यांचे सहकार्य आहे. 

लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील परिवर्तन पॅनेलला एक जागा बिनविरोध मिळाल्याने उर्वरित 16 जागांसाठी निकराची लढत होत आहे. अकलूजच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये माने पाटील विरूद्ध माने पाटील, तीनमध्ये मोहिते पाटील विरूद्ध माने पाटील या लढती लक्षवेधी होत आहेत. 

तालुक्‍यातील महत्त्वाच्या इतर लढती 

मोरोचीत किशोर सूळ यांच्या सत्तेचे काय? 

माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर शिवाजीराव सूळ यांच्याविरोधात मोरोची गावातील परंपरागत विरोधक साळुंखे आणि हनुमंतराव सुळ यांनी बाजूला होऊन तरूणांचा परिवर्तन पॅनेल उभा केला आहे. त्यामुळे किशोर सूळ यांच्या सत्तेचे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नातेपुतेमध्ये देशमुखांना नागरी संघटनेचे आव्हान 

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र पाटील, रघुनाथ कवितके, मामासाहेब पांढरे, आप्पासाहेब भांड, चंद्रकांत ठोंबरे यांच्या जनशक्ती पॅनेलला नातेपुते ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 7 जागा बिनविरोध मिळालेल्या आहेत. त्यांच्या विरोधात माजी सरपंच ऍड. भानुदास राऊत आणि दोन्ही काळे मळ्यातील तरुणांनी एकत्र येऊन नागरी संघटनेची स्थापना केली आहे. नागरी संघटनेस 10 पैकी किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मळोलीत मोहिते पाटील गटाविरोधात जाधव 

पंचायत समिती सदस्य रणजिसिंह जाधव यांची मळोलीत 62 वर्षांपासून एक हाती सत्ता आहे. त्यांच्याविरोधात मोहिते-पाटील यांना मानणाऱ्या गटाने पॅनेल उभा केला आहे. 

चार ग्रामपंचायती बिनविरोध 

माळशिरस तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया चालू असून त्यापैकी गोरडवाडी, मिरे, गिरझणी, बाभूळगाव या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. 44 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. महाळुंग ग्रामपंचायतीसाठी एकाही उमेदवारांचा अर्ज न आल्याने तेथील 17 जागा रिक्त राहिल्या आहेत. तालुक्‍यात एकूण 90 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 44 ग्रामपंचायतींच्या 424 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. 

नगरपरिषदेचा तिढा 

अकलूज, नातेपुते व श्रीपूर-महाळूंग या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे येथील निवडणुका न घेण्याबाबत सरकारने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राचा विचार होईल व निवडणुका थांबतील, अशी अशा होती. त्यातच महाळुंग ग्रामस्थांनी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. त्याच प्रमाणे नातेपुते व अकलूज ग्रामस्थांनीही अर्ज भरू नये, असा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न झाला. परंतु, काहींनी अर्ज भरल्याने येथील निवडणुका लागल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT