reporters asked questions on petrol, Fadnavis got up from chair
reporters asked questions on petrol, Fadnavis got up from chair 
मुख्य बातम्या मोबाईल

पेट्रोलवर बोला म्हणताच फडणवीस खुर्चीतून उठले 

सरकारनामा ब्युरो

पुणे : गेल्या 19 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच मुद्यावर सोलापुरात प्रश्‍न विचारताच माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी खुर्चीतून उठून निघून जाणे पसंत केले.  

देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा आढावा घेण्यासाठी पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा दौरा घेतला. त्यांनी या वेळी कोरोनाचे रुग्ण, उपचाराची व्यवस्था, कोरोनाच्या चाचण्या याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी दोन्ही शहरांत पत्रकार परिषद घेत कोरोनाशी लढताना जाणवणाऱ्या उणिवा, त्रुटी याबाबत राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. उपचार पद्धतीत काय बदल करायला हवेत, रुग्णांना आणखी कोणत्या सुविधा द्यायला हव्यात, या गोष्टींचाही त्यांनी उहापोह केला. 

दरम्यान, गेल्या 19 दिवसांच्या कालावधीत डिझेल दरामध्ये लिटरमागे 10.63 रुपयांनी वाढ झाली आहे. एका दिवसाच्या खंडानंतर पेट्रोलच्या दरात लिटरमागे 16 पैशांची वाढ करण्यात आली आहे. तीन आठवड्याहून कमी कालावधीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 8.66 रुपयांनी वाढ झालेली आहे. 

सोलापूर येथील पत्रकार परिषदेत कोरोनाबाबत माहिती देऊन झाल्यानंतर काही प्रश्‍न विचारण्यात आले. त्या वेळी शेवटी काही पत्रकारांनी त्यांना डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या दराबाबत प्रश्‍न विचारले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी "मी बोलले आहे,' असे सांगून पत्रकार परिषद आटोपती घेत निघून जाणे पसंत केले. पत्रकारांनी "डिझेल, पेट्रोलच्या वाढत्या दराबाबत बोला, साहेब.' "पेट्रोलवर बोला, जाऊ नका,' अशी विनंती केली. मात्र व्यासपीठावरील नेतेमंडळी न थांबता निघून गेले. 

या वेळी व्यासपीठावर सोलापूरचे भाजपचे खासदार जयसिद्धेश्‍वर महाराज, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, राम सातपुते, प्रशांत परिचारक, जयकुमार गोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व इतर नेतेमंडळी उपस्थित होते. 

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या भावात वाढ झाल्याचे निमित्त पुढे करून केंद्रातील भाजप सरकारने गुरुवारी 19 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. मागील 19 दिवसांत डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10.63 रुपये तर, पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 8.66 रुपये वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत डिझेल हे पेट्रोलपेक्षा महाग झाल्याचे इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील ही आणखी एक विक्रमी कामगिरी ठरली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT