Chhatrapati-Sambhajiraje---.jpg
Chhatrapati-Sambhajiraje---.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

संभाजीराजे छत्रपती यांचे नरेंद्र मोदी यांना रायगड चढण्याचे 'फिटनेस चॅलेंज'

निवास चौगले

कोल्हापूर :  जोर (पुशअप), चालणे यासारखा व्यायाम करून त्याचा व्हीडीओ आनंदाने सोशल मिडीयावर पोस्ट करणाऱ्यांना कोल्हापुरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 5 जून रोजी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिन कार्यक्रमात पायी रायगड चढण्याचे आवाहन केले आहे.

ट्विटरद्वारे श्री. संभाजीराजे यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते "#HumFitTohIndiaFit' या हॅशटॅगने सुरु झालेल्या "#FitnessChallenge' मोहिमेत सहभागी झालेले केंद्रीय मंत्री, अधिकारी आणि अभिनेते यांनाही रायगडावर पायी या आणि आपला "फिटनेस' सिध्द करण्याचे आवाहन केले आहे.
माहिती प्रसारण, युवा, क्रीडा खात्यांचा कारभार पाहणारे केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड यांनी 22 मे रोजी "#HumFitTohIndiaFit' या हॅशटॅगने "#FitnessChallenge' सुरु केली. त्यांनी ह्रतिक रोशन, विराट कोहली, सायना नेहवाल यांना आव्हान देत त्यांचे फिटनेस व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करण्यास सांगितले. 

त्यापैकी विराट कोहलीने तर आपला फिटनेस व्हिडिओ पोस्ट करत पुढे चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपली पत्नी तसेच एम.एस.धोणी यांना आव्हान दिले. ट्‌विटरवर खूपच सक्रीय असलेल्या नरेंद्र मोदींनी आपले योगा करतानाचे फोटो पोस्ट करत आव्हानाला तोंड दिले. त्यानंतर ही मोहीम आणि #HumFitTohIndiaFit #FitnessChallenge हे हॅशटॅग चॉंगलेच ट्रेंड झाले.

आता खासदार संभाजी छत्रपतींच्या ट्‌विटमुळे अनेकांची पंचाईत झाली आहे. दरवर्षी 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर साजरा केला जातो. संभाजी छत्रपती स्वत: त्यासाठी सक्रीय पुढाकार घेतात. यावेळी त्यासोहळ्यासाठी स्वत: आणि शिवभक्तांचा पायी चालत रायगडावर जातानाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. 

त्यासोबत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री राजवर्धन राठोड, किरण रिजिजू, कॉंग्रेस नेते ज्योतिर्रादित्य शिंदे, अभिनेता आमीर खान, अक्षयकुमार, अजय देवगण , रितेश देशमुख यांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

पाच जून रोजी दुपारी तीन वाजता माझ्यासोबत किल्ले रायगडावर चला असे त्यांनी सुचवले आहे. 'हम फिट तो इंडिया फिट' हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संभाजी छत्रपतींनी दिलेले हे फिटनेस चॅलेंज स्वीकारणे अनेकांसाठी सोपे नाही. पायथ्यापासून माथ्यापर्यंत पंधराशेपेक्षा जास्त पायऱ्या चढत किमान अडीच तासांचा पायी प्रवास अनेकांच्यादृष्टीने आव्हान असेल. त्यामुळेच बहुधा आतापर्यंत तरी एकानेही त्यांना प्रतिसाद दिलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT