Sanjay Raut should not teach us to fight against Dalit oppression
Sanjay Raut should not teach us to fight against Dalit oppression 
मुख्य बातम्या मोबाईल

दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याबाबत संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये 

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : "शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध "ब्र' शब्दसुद्धा काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल, तेथे मी पोचलेलो आहे. दलित अत्याचाराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. "दलित पॅंथर'च्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचे शिकवू नये,' असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राऊत यांना लगावला. 

संजय राऊत यांनी आठवले यांच्यावर टीका करताना हाथरस प्रकरण घडत असताना आठवले हे नटींच्या घोळक्‍यात होते, असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना आठवले यांनी म्हटले आहे की राऊत हे नटींच्या घोळक्‍यात असतात की नाही ते माहीत नाही. मी नटींच्या घोळक्‍यात नसतो, तर नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्‍यात असतो. दलित अत्याचाराविरुद्ध लढणारा मी मूळ पॅंथर आहे, असेही आठवले यांनी म्हटले आहे. 

हाथरसची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरसच्या घटनेची माहिती मिळाताच त्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध, आंदोलन केले. लखनौला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना भेटलो. हाथरसला भेट देण्यास जाताना तेथील जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेट देण्यापासून अडविले होते. त्यामुळे मी 2 ऑक्‍टोबरला हाथरस जाऊ शकलो नाही. आता मात्र उद्याच (ता. 6 ऑक्‍टोबर) हाथरसला जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. त्यांना संरक्षण मिळवून देणार आहे, असे आठवले यांनी सांगितले. 

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे कलावंतांची कदर करणारे नेते होते. त्यांचे अनेक चित्रपट कलाकारांशी चांगले संबंध होते. त्यामुळे एखाद्या अभिनेत्रीवर अन्याय झाला असताना त्या महिलेची बाजू संजय राऊत यांनी घेतली नाही. कलाकार, अभिनेत्री यांना महिला म्हणून सन्मान न देता त्यांना जाहीर अपशब्द वापरले आहेत. त्यातून कलाकारांचा सन्मान करण्याची बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती, त्या भूमिकेला हरताळ फसण्याचे काम राऊत यांनी केले आहे, असे आठवले म्हणाले. 

ते म्हणाले की, कंगना राणावत प्रकरणात आम्ही कधीही संजय राऊत यांच्यावर टीका केली नाही, ते आमच्यावर टीका करीत असले तरी त्यातून मी त्यांच्यावर नाराज नाही. ते माझे मित्र आहेत. पायल घोष ही अभिनेत्री तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत भूमिका मांडते. ती अभिनेत्री असली तरी प्रथम ती एक महिला आहे, त्यातून आम्ही तिची बाजू घेतली. राऊत यांनी तिची बाजू घेतली का? जिथे जिथे महिलांवर दलितांवर अत्याचार होतात, तिथे तिथे आम्ही त्या महिलेची बाजू घेत आलो आहोत. 

दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत. पण, संजय राऊत हे कधी "सामना'मधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत आणि संसदेत खासदार म्हणून ही दलित अत्याचार प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला नाही. दलितांच्या प्रश्नांवर दलित लढत असतात. पण दलितांच्या प्रश्नांसाठी सवर्ण पुढाऱ्यांनी कधी लढा उभारला आहे का? दलितांचे मतदान हवे आहे. पण, दलितांवरील अत्याचाराचा निषेध तरी यापूर्वी कधी संजय राऊत आणि त्यांच्या पक्षनेत्यांनी केला आहे का? असा सवाल आठवले यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT