मुख्य बातम्या मोबाईल

मोझरांचा राजीनामा बेदखल केल्याने 'मनसे'च्या 107 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे! 

सरकारनामा ब्युरो

सातारा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या 107 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले आहेत. रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांच्या अध्यक्षतेखाली रहिमतपूरमध्ये मंगळवारी एक बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

जनहित कक्षाचे जिल्हा संघटक मनोज माळी यांनी एक पत्रक काढले असून त्यामध्ये म्हटले आहे की, संदीप मोझर यांनी नुकताच त्यांच्या पदाचा व पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. मनसेच्या पडत्या काळात कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पक्षीय धोरणावर पश्‍चिम महाराष्ट्रात पक्ष जोमाने उभी करण्याचा चंग बांधून पक्षाचे काम केले. अनेक आंदोलने उभी करुन ती तडीस नेण्यासाठी त्यांनी तन, मन, धनाने अहोरात्र कष्ट घेतले. त्यामुळे पक्षाच्या एवढ्या मोठ्या नेत्यावर राजीनामा देण्याची वेळ येत असेल तर ही बाब संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यासाठी आणि एकूणच पक्षासाठी घातक आहे. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे आम्हीही पक्षत्याग करत आहे. मोझर यांनी स्वत:हून अन्य सर्व पदाधिकऱ्यांनी पक्षातच राहण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी त्यांनी निर्णय जाहीर करुन तीन दिवस उलटले तरी पक्षातील जबाबदार व वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत काहीच प्रतिक्रिया व्यक्त होत नाही तसेच विचारणाही केली जात नाही. हा प्रकार आमच्यासाठी अपमानास्पद आहे. त्यामुळे आमचा स्वाभिमान अखंडित रहावा व त्यांची वैचारिक पाठराखण करण्यासाठी राजीनामापत्रावर स्वाक्षरी करुन सर्व प्रमुख पदाधिकारी पक्ष सदस्यत्व आणि पदांचा सामुहिक राजीनामा देत आहोत. तरी ते राजीनामे पक्षाध्यक्षांनी मंजूर करावेत, असेही या पत्रकात म्हटले आहे. 

माळी यांनी दिलेल्या पत्रकावर वासुदेव माने, मनोज माळी, बाळासाहेब बाबर, बाळकृष्ण पिसाळ, सुभाष चौधरी, सागर पवार, सागर केंजळे आदींसह मनसेच्या सर्व आघाडी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT