Satej Patil
Satej Patil 
मुख्य बातम्या मोबाईल

सतेज पाटलांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याची चिन्हे!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ठाकरे सरकारच्या (Thackeray Govt Reshuffle) मंत्रीमंडळ विस्ताराची पुन्हा चर्चा सुरू झाली असून यात काॅंग्रेसमध्ये जास्त बदल होणार असल्याची चिन्हे आहेत. शिवसेनेतही काही बदलांची अपेक्षा आहे. या फेरबदलात काॅंग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू मिळणार असून एका राज्यमंत्र्याला कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळणार असल्याचा अंदाज आहे. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे नाव बढतीसाठी आघाडीवर आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने काॅंग्रेसमधील पत्ते पुन्हा पिसले जाणार आहेत. यात एका विद्यमान मंत्र्याला अध्यक्षपदी विराजमान केले जाईल. त्या रिक्त पदावर नवीन तरुण रक्ताला संधी मिळू शकते. यात प्रणीती शिंदे, संग्राम थोपटे यांची नावे आघाडीवर आहेत. 

पश्चिम महाराष्ट्रात काॅंग्रेसकडे बाळासाहेब थोरात वगळता दुसरे कॅबिनेट मंत्रीपद नाही. सतेज पाटील यांची कोल्हापुरातील गोकुळच्या निवडणुकीत चांगली कामगिरी राहिली. ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते. त्यांचा ठाकरे सरकारमध्ये पुन्हा राज्यमंत्री म्हणूनच समावेश झाला होता. मात्र आता त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्याचा विचार आहे. 

या फेरबदलासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीने नुकतेच सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे. या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. यात आदिवासी विकासमंत्री के. सी. पडवी यांचे नाव घेतले जात आहे. त्यांना मंत्रीपद गमवावे लागेल. त्यांचे अध्यक्षपदावर पुनर्वसन होऊ शकते किंवा त्यांना आमदार म्हणून राहावे लागेल. विदर्भातील एका मंत्र्याचेही नाव अध्यक्षपदासाठी आहे. विदर्भातील दोन मंत्र्यांवर सध्या न्यायालयीन कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणाचा राजकीय बळी जाणार का, याची शक्यता व्यक्त होत आहे. 

शिवसेनेकडील एक मंत्रीपद रिक्त आहे. माजी मंत्री संजय राठोड यांना एका आत्महत्या प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन होण्याचा मार्ग खुला झाला आहे. या शिवाय विदर्भातून आशिष जयस्वाल यांना संधी देण्याची चर्चा पक्षात सुरू आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील घडामोडींमुळे मंत्रीमंडळात काही नवीन चेहरे दिसू शकतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT