scuffle between India and China at Ladhak
scuffle between India and China at Ladhak 
मुख्य बातम्या मोबाईल

चीनी सैन्याच्या हल्ल्यात एका कर्नलसह दोन सैनिक शहीद 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशाच्या सैनिकांत झटापट झाली आहे. या झटापटीत भारताचे एक कर्नल दर्जाचे अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले आहेत. ही झटापट गालवान खोऱ्यात घडली आहे. चीनच्या सीमेवर 1967 नंतर प्रथमच अशी मोठी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची तातडीने बोलावली आहे.  या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, चीफ  आॅफ जनरल बिपीन रावत, तीनही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित आहेत. 

गेली दोन महिन्यांपासून चीनच्या सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती. काही दिवसांपूर्वी चीनच्या सीमेवर दोन्ही बाजूकडून हालचाली सुरू होत्या. त्यानंतर दोन्ही बाजूकडून लष्करातील लेफ्टनंट जनरल स्तरावर बैठका सुरू होत्या. अशा सुमारे बारा ते तेरा लष्करी बैठका झाल्या होत्या. या बैठकानंतर चीनचे आपले सैन्य मागे घेतल्याचे सांगितले जात होते.

परंतु पूर्व लडाख आणि गलवान खोऱ्यात परिस्थिती तणावाची होती. त्यातूनच ही झटापटीची घटना घडल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी चीन आपले सैन्य माघारी घेतले, असे सांगितले जात असले तरी सीमेवर मात्र अद्याप तणाव असल्याचे दर्शविणारी ही घटना आहे. काल रात्री झालेल्या या झटापटीत चीनचेही नुकसान झाल्याचे भारताने सांगितले आहे. चीनने अद्याप याविषयी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 

काही दिवसांपूर्वी नेपाळ सरकारने भारताचा काही भाग आपल्या नकाशात दाखवून अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला होता. त्यामागेही चीनाचा हात असल्याची चर्चा होती. त्यातून आज पुढे आलेल्या घटनाचे महत्त्व आहे. कोरोनाच्या संकटात मात्र भारत सरकारसमोर ही नवी समस्या उभी राहिली आहे. 

याबाबत ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की "चीनची ही दादागिरी सुरू आहे. त्याला भारताने तातडीने प्रत्युत्त द्यायला हवे. ते आपले लष्कर देईल, असा मला विश्‍वास आहे. चीनला राजकीय मुसद्देगिरीची भाषा समजत नाही. त्यांना कडक उत्तर द्यायला हवे. ते देईपर्यंत चीन सीमेचा हा वाद मिटणार नाही.' 

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी लडाखमध्ये चीनला तोडीस तोड लष्करी दल उभे केल्याचे सांगितले होते. तरीही अशी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास चीनमधून सुरवात झाली. त्यामुळे चीनविरोधात जगात नाराजीचे वातावरण आहे. त्यानंतरही शेजारच्या देशांशी कुरापत काढण्याचे चीनचे धोरण राहिले आहे. त्यामुळे चीनच्या विरोधात भारतात संतापाची लाट आली आहे. त्यात तीन भारतीय सैनिक शहीद झाल्याने या संतापात आणखी भर पडली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT