Sharad Pawar, Ajit Pawar made me Leader of Opposition : Dhananjay Munde
Sharad Pawar, Ajit Pawar made me Leader of Opposition : Dhananjay Munde  
मुख्य बातम्या मोबाईल

ज्यावेळी लोक मला शिव्या देत होते, त्यावेळी पवारांनी विरोधी पक्षनेता केले 

सरकारनामा ब्यूरो

परळी वैजनाथ : मला इथपर्यंत पाठविण्यासाठी अनेकांनी खस्ता खालल्या आहेत, याची मला जाणीव आहे. ज्या काळात लोक मला शिव्या देत होते, त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेतेपद दिले, हे मी कधीही विसरणार नाही, शब्दांत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात भावना व्यक्त केल्या. (Sharad Pawar, Ajit Pawar made me Leader of Opposition : Dhananjay Munde)

मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीतील जगमित्र कार्यालयासमोर गुरुवारी (ता. १५ जुलै) अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री मुंडे बोलत होते.  

ते म्हणाले की, मी राजकारण करत गेलो. अनेक सहकारी सोबत आले, मला नेता म्हणायला लागले. आमच्या राजकारणात प्रामाणिकपणा आहे; म्हणून लोकांनी डोक्यावर घेतले. अनेक निवडणुका लढलो आणि पडलोपण. पण, भविष्यात प्रत्येक निवडणूक जिंकणार आहे. तुमच्या विश्वासाने कोरोना काळात जिवंत ठेवले. समाजकारणात राजकारण केले नाही, समाजकारणच केले. पण, ‘समय के साथ बदलना होता है!’ काही जण म्हणाले, मी मनात राजकारण आणले नव्हते. पण, आता आणणार आहे, हे मी जन्मादिवशी ठरवले आहे. सत्तेच्या राजकारणात ज्याचा दोष नाही, त्याला दोष दिला जातो. हे माझ्या बाबतीत घडले आहे. 

राजकारणात आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केल्यामुळे जनतेने मला डोक्यावर घेतले. राजकारणात कधीही दिखाऊपणा केला नाही. कार्यकर्त्यांनीही दिखाऊपण करू नये. इथून पुढे येणारी प्रत्येक निवडणूक मी जिंकणार आहे, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी या वेळी  बोलताना व्यक्त केला. 

मायभूमीत कायमस्वरूपी क्वारंटाइन होण्यास तयार 

वाढदिवस सोहळा कुठे साजरा करावा, हा प्रश्न होता. मुलगी वैष्णवी अमेरिकेत आहे, तिकडे जावे का. पण अमेरिकेत गेले तर १४ दिवस क्वारंटाइन व्हावे लागते, त्यापेक्षा आपल्या मायभूमीत कायमस्वरूपी क्वारंटाइन होण्यास तयार आहे. म्हणून येथेच वाढदिवस साजरा केला. स्वतःच्या जन्मावर स्वतःच काय बोलावे, हा प्रश्न आहे. जगात यापेक्षा कोणतेही अवघड काम नाही, असेही मुंडे यांनी नमूद केले.  
 
या वेळी व्यासपीठावर धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे, पत्नी राजर्षी मुंडे, अजय मुंडे, वाल्मिक कराड, मुलगी आदिश्री आदी परिवारातील सदस्य तसेच पदाधिकारी, नेते मंडळी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT