मुख्य बातम्या मोबाईल

"रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवार, सचिवपदी डॉ. विठ्ठल शिवणकर

सरकारनामा ब्युरो

सातारा : आशिया खंडात सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, जयश्री आनंदराव चौगुले, अरूण पुंजाजी कडू-पाटील, पी.जे.पाटील, आमदार चेतन विठ्ठलराव तुपे यांची तर सचिवपदी नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांची निवड झाली आहे. 

या सर्व पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षांसाठी बिनविरोध निवडी झाल्या आहेत. उच्च शिक्षण सहसचिवपदी येथील धनंजयराव गाडगीळ वाणीज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.प्रतिभा गायकवाड यांची तसेच माध्यमिक शिक्षण सहसचिवपदी नगर येथील संजय नागपूरे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी  मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांचीही निवड करण्यात आली.

रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षासाठी निवड करण्याकरीता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संस्थेच्या जनरल बॉडीची सभा आज झाली. रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड दर तीन वर्षानी केली जाते. या निवडी आजवर कर्मवीर पुण्यतिथी दिवशी म्हणजेच नऊ मे रोजी केल्या जात. 

यंदा कोरोनामुळे या निवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आज सुरक्षीत अंतराचे नियम पाळून जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभा झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्यासह सर्व जनरल बॉडीचे सदस्य उपस्थित होते.

सचिवपदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र, बैठकीत प्राचार्य डॉ. शिवणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आज निवडलेले मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य पुढीलप्रमाणे : डॉ.अनिल पाटील, ऍड.भगीरथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, रामशेठ ठाकूर, ऍड.रविंद्र पवार, मीनाताई जगधने, डॉ.विश्वजीत कदम, प्रभाकर देशमुख, दादाभाऊ कळमकर, बाबासाहेब भोस, मुमताजअली शेख, डॉ.यशवंत थोरात, रामचंद्र गायकवाड ,कृष्णराव घाटगे, प्रिं.डॉ.भारत जाधव, प्रो.डॉ.शिवलिंग मेनकुदळे,चंद्रकांत वाव्हळ, डॉ.भाऊसाहेब कराळे, विलास महाडीक, प्रिं.डॉ.गणेश ठाकूर, ऍन्थोनी ऍलेक्‍स डिसोझा, तुकाराम कन्हेरकर, प्रा.डॉ.काळुराम कानडे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT