शिक्रापूर (जि. पुणे) : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख माऊली कटके ते शिरूरचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे या सर्वांनी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याबद्दल शिक्रापुरातील सभेत जाहीर टीका केली. पण, यातील एकानेही आमदार पवारांचे नाव घेण्याची हिंमत दाखवली नाही. अशोक पवारांबद्दलच्या तक्रारी मुख्यमंत्री समन्वय समितीत घेण्याची घोषणाही राऊत यांनी नामोल्लेख टाळूनच केली. त्यामुळे अशोक पवारांचा धसका शिवसेना नेत्यांनीही घेतला आहे का, असा प्रश्न चर्चिला जात आहे. (Shiv Sena leaders criticized MLA Ashok Pawar by avoiding naming)
शिरुर-हवेलीतील शिवसैनिकांचा मेळावा शिक्रापुरात झाला. या मतदारसंघातून शिवसैनिक मोठ्या संख्येने आले होते. खचाखच भरलेल्या या कार्यक्रमात खरे तर महाआघाडीचा राजकीय शत्रू भारतीय जनता पक्षावर आगपाखड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपबद्दल फार काही न बोलण्याची स्पर्धाच बहुतेक सर्व नेत्यांमध्ये दिसली. अर्थात, टीकचा सर्व रोख हा राष्ट्रवादीचे शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यावर होता. तब्बल ४१ हजारांच्या फरकाने अशोक पवार या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. तरीही ही जागा आता शिवसेनेला हवी म्हणत जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांनी विधानसभेत जाण्याची आपली इच्छा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. मात्र, इच्छा व्यक्त करताना त्यांनी अशोक पवारांचा कुठेही उल्लेख केला नाही.
तालुकाप्रमुख-जिल्हाप्रमुखांची हवेत तलवारबाजी
शिवसेनेचे शिरुर तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी आमदार पवार अध्यक्ष असलेल्या घोडगंगा कारखान्याबद्दल बोलताना कारखाना कर्जबाजारी आहे. कामगारांच्या पगारापोटीचे ३० कोटी देणे आहे, कारखान्याकडून केवळ २१०० रुपये प्रतिटन भाव दिला जातोय. पुण्यातील एका साखर वाटप कार्यक्रमात आपल्याला मारहाण झाली, असे गाऱ्हाणे मांडले. मात्र, अशोक पवारांचे नाव मात्र घेतले नाही. जिल्हाध्यक्ष कटके यांनी सांगितले की, येत्या विधानसभा निवडणुकीत शिरुर-हवेली भगवा करायचा आहे. हवेलीच्या इतिहासात आपण पहिल्यांदा शिवसेनेचा पंचायत समिती सभापती करुन दाखविला आणि राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात जिल्हा परिषद-पंचायत समितीत आपण फळीफोड करणार असे सांगितले. प्रशासनावर दबाव टाकून अनेक ग्रामपंचायतींमध्ये लक्ष घातले जाते. तसेच, गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोपही त्यांनी आमदारांचा नामोल्लेख टाळून केला.
हवेलीच्या तालुकाप्रमुखावर जीवे मारण्याच्या धमकीचा एक गुन्हा दाखल केला, तो आपण मागे घ्यायला लावला. मात्र शिक्रापूरमध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला पोलिस ठाण्यात बोलावून अर्वाच्च भाषेत बोलल्याने त्या अधिकाऱ्याची बदली आपण करुन घेतली. यशवंत कारखाना सुरू करण्याऐवजी घोडगंगा कारखान्याचाच यशवंत केलाय. हे सर्व सांगतानाही कटके यांनी कुठेही पवारांचे नाव घेतले नाही, हे विशेष.
नाव न घेताच आढळराव-मिर्लेकर-राऊतांची भाषणबाजी
आढळराव हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना थेट अंगावर घेण्यासाठी २००४ पासून सर्वश्रुत आहेत. भाषणाची सुरवात करतानाच त्यांनी सांगितले की, मला २००४ पासून सुखाचे दिवस नाहीत. सुरवातीला कॉंग्रेस-राष्ट्रवादी, नंतर भाजप आणि आता या सर्वांबरोबरच आपल्याला संघर्ष करावा लागतोय. हे सांगताना त्यांनी जिल्हा पोलिस दबावाखाली असल्याचे वक्तव्य केले. पण, येथेही पुन्हा आमदार अशोक पवारांना केंद्रस्थानी ठेवूनही त्यांचा नामोल्लेख आढळरावांनीही टाळल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले.
मिर्लेकरांनी आपल्या भाषणाची सुरवातच अशी केली की, इथल्या आमदारांच्या बऱ्याच तक्रारी शिवसैनिकांनी माझ्याकडे केल्या आहेत. मला १९९० पूर्वीचा जुना काळ आठवला. त्यावेळी शिवसेनेचा एकही आमदार नसताना आम्ही लढलो. येथील आमदार त्रास देत असतील तर त्यांना सांगा, ‘खेडमध्ये सुरेश गोरेंनी मोहितेंना लोळविले आहे. वाघाला डिवचू नका, पळता भूई थोडी करू,’ हे सांगताना मिर्लेकरांनी मोहितेंचा उल्लेख केला. पण, पवारमधील ‘प’ही उच्चारला नाही.
खासदार संजय राऊत तरी थेट बोलतील, अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती. मात्र, खेडसारखीच येथेही परिस्थिती आणि तोच विषय असल्याचे आपल्या लक्षात आले आहे. जिल्ह्याचे नेते, देशाचे नेते आहेत. त्यांचे स्थानिक शिलेदार, वतनदार यांनी संयम राखावा. यापुढे आमच्यासोबतच संसार करायचाय, हेही त्यांनी लक्षात घ्यावे. स्थानिक राजकारणात चढाया बढाया होत असल्या तरी शिवसेना संघटना एखादा उमेदवार पाडू शकते, अशी ताकद तयार करण्याचे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केला. राऊतांनी अशोक पवारांचा उल्लेख टाळला. उलट या विषयावर आता मुख्यमंत्री समन्वय समितीपुढे चर्चा केली जाईल, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.