Shiv Sena provides security cover to priests in Mumbai
Shiv Sena provides security cover to priests in Mumbai  
मुख्य बातम्या मोबाईल

शिवसेनेतर्फे मुंबईत पुरोहितांना सुरक्षा कवच 

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : नागरिकांना आर्थिक, वैद्यकीय व प्रत्यक्ष सुरक्षा देणाऱ्यांना कोरोना योद्धे म्हणून गौरविले जाते, त्यांच्या सर्व गरजा पुरवल्या जातात. मात्र, लोकांना धार्मिक-आध्यात्मिक सुरक्षा देणाऱ्या पुरोहितांकडे सध्या कोणाचेच लक्ष नाही. ही बाब ध्यानात घेऊन गोरेगावात शिवसेनेतर्फे पुरोहितांना सुरक्षा कवच देऊन सन्मानित करण्यात आले. 

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे मुंबईत बहुतेक ठिकाणी देऊळ बंद आहेत. तरीही देवाची पूजाअर्चा करण्यासाठी पुरोहितांना देवळात जावेच लागते. जाता येता देखील त्यांना कोरोना विषाणूची धास्ती असतेच. श्रावण महिना उलटून गेला तरी पुरोहितांना धार्मिक कार्यक्रमांसाठी कोणाकडे जाताही येत नाही. 

अनेक पुरोहितांनी ऑनलाइन पूजेचा मार्ग धरला असला तरी प्रत्येक ठिकाणी ते शक्‍य होत नाही. धार्मिक कृत्ये होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते, त्यांना आध्यात्मिक समाधानही मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्या गोरेगाव विभागाचे विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी हा उपक्रम आयोजित केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मराठी, हिंदी व दाक्षिणात्य पुरोहितांना हे सुरक्षा कवच देण्यात आले. 

बरेच भाविक पुरोहितांना बोलवत नसले तरी अनेक ठिकाणी भाविकांना धार्मिक कार्यक्रम-सणवार करण्याची इच्छा असते, ते पुरोहितांना बोलावतात देखील. पण भीतीपोटी पुरोहित यजमानांकडे धर्मकार्य करण्यासाठी जाऊ शकत नाहीत. त्यातच सरकारी निर्बंध देखील आहेतच. 

सध्या गणेशोत्सवात प्राणप्रतिष्ठपनेसाठी तसेच अन्य पूजांसाठीही पुरोहितांची आवश्‍यक्ता असते. हे ध्यानात घेऊन त्यांना धर्मकार्ये करता यावीत, यासाठी त्यांना मास्क, फेसशील्ड, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या या सुरक्षा साधनांबरोबरच सोवळे, टोपी व उपरणे देण्यात आले. 

पुरोहितांनी सरकारी नियमांचे पालन करून विधीवत श्री गणेशाची पूजा करावी आणि कोरोनाचे संकट टाळावे, असे साकडे त्याला घालावे, असे देसाई यांनी पुरोहितांना सांगितले. या उपक्रमाची व्याप्ती वाढविली जाईल व जास्तीत जास्त पुरोहितांना हे सुरक्षा कवच दिले जाईल, असे शिंदे यांनी या वेळी सांगितले. 

हेही वाचा : सरकारला मदत करणाऱ्या सिद्धिविनायक ट्रस्टविरोधात हायकोर्टात याचिका 

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने राज्य सरकारला दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. 

कोरोनामध्ये बेघर आणि स्थलांतरित मजुरांसाठी शिवभोजन सरकारी योजना आणि कोरोना निधीसाठी मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र, न्यास कायद्यानुसार अशा प्रकारे राज्य सरकारला मदत करता येत नाही. त्यामुळे संबंधित व्यवहार बेकायदेशीर आहे, असा दावा याचिकादार ऍड. लीला रंगा यांनी केला आहे. 

सध्या मुदत संपलेल्या विश्‍वस्तांना अधिक मुदतवाढ देऊ नये. तसेच, न्यायालयाकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही याचिकादाराकडून करण्यात आली आहे. आर्थिक मदत देताच ट्रस्टच्या विद्यमान अध्यक्षांना राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. 

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि ट्रस्टला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले असून याचिकेवर खुलासा करण्यास सांगितले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे. आजच्या सुनावणीत याचिकादाराला कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT