Shiv Sena's involvement in Rs 1,000 crore corruption on Coastal Road : Shelar 
मुख्य बातम्या मोबाईल

कोस्टल रोडच्या एक हजार कोटींच्या भ्रष्टाचारात शिवसेनेची भागिदारी? : शेलारांचा खळबळजनक आरोप 

कुणाच्या आशीर्वादाने हा सारा प्रकार सुरु आहे?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई  ः कोस्टल रोडच्या कामात ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०२० याकाळात सुमारे १ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून शिवसेनेने या घोटाळ्यात भागिदारी केली आहे काय? असा सवाल करत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या संपूर्ण प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी आज (ता. ६ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत केली आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, याची तातडीने दखल घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Shiv Sena's involvement in Rs 1,000 crore corruption on Coastal Road : Shelar)

आमदार आशिष शेलार यांनी यांसदर्भात आज वांद्रे पश्चिम येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात वरील आरोप केले. शेलार म्हणाले की, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने जे महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले, त्यातील अत्यंत महत्त्वाच्या कोस्टल रोड प्रकल्पाला आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची किड लागल्याचे आता उघड होते आहे. यामुळे मुंबईकरांना मेट्रोप्रमाणे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे, हे दुर्दैवी. ह्या प्रकल्पात अंदाजे १ हजार कोटी व अधिकचा घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आहे. भाजपची टीम यावर लक्ष ठेवून आहे, यामध्ये काही मोठे लागेबांधे असण्याची शक्यता असल्याने या प्रकरणी तातडीने एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र आमदार आशिष शेलार यांनी मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दिले आहे. 

हा संपूर्ण घोटाळा स्थायी समितीच्या सहमतीने झाला आहे का? जेव्हा मुंबईकर कोरोनकाळात घरात बंद होते, तेव्हा शिवसेनेचे हे घोटाळे सुरु होते का? याची कंत्राटे कोणाला दिली, हे सगळे आम्ही उघड करू. मात्र, त्याआधी या सगळ्याची उत्तरे सताधारी म्हणून शिवसेनाला द्यावी लागतील; अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाने ही लढाई लढू, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

आयुक्त चहल यांना लिहिलेल्या पत्रात आमदार आशिष शेलार यांनी पुढील प्रश्न विचारले आहेत. 

१) कोस्टल रोडच्या टप्पा एकमधील भरावासाठी लागणारा दगड आणि साहित्य हे सरकारच्या परवानाधारक खाणीतून न उचलता ते अन्य ठिकाणाहून उचलण्यात आले. त्यामुळे या कंत्राटदार कंपनीने महाराष्ट्र सरकारला रॉयल्टीतून मिळणाऱ्या रुपये 437 कोटींची अफरातफर केली आहे. यामागे कुणाचा वरदहस्त आहे?

२) भरावासाठी टेंडरमधे नमूद केलेल्या अटींपेक्षा उच्च घनतेच्या व कमी दर्जाच्या भराव साहित्याचा वापर करुन महापालिकेकडून अतिरिक्त 48.41 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. हे महापालिकेचे नुकसान का करण्यात आले?

३) कोस्टल रोड कंत्राटदाराने भराव सामग्रीची वाहतूक करताना बेकायदेशीर व ओव्हरलोड वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिस वाहतूक विभागाने आकारलेला दंड सुमारे 81.22 कोटी रुपये का भरण्यात आला नाही? हा दंड माफ करुन यामध्ये कोणी कट कमिशन घेण्यासाठी काही षडयंत्र रचते आहे का? तसेच ३५ हजार बोगस फेऱ्या दाखवण्यात आल्याची माहिती आमच्याकडे आहे. हे खरे आहे काय?

४) कंत्राटदारांनी पुरवलेल्या निकृष्ठ दर्जाचे साहित्य वादळांमध्ये वाहून गेले, ते नुकसान महापालिकेकडून वसूल करण्यात आले का? साहित्यामुळे महापालिकेचे 17.86 कोटी नुकसान का करण्यात आले? हा भुर्दंड पालिकेला का?

५) आक्टोबर 2018 ते डिसेंबर 2020 या काळात केवळ टप्पा 1 मधील विविध कामात महाराष्ट्र सरकार आणि पालिकेची ६८४ कोटींची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे.

६) सर्वात चिंताजनक म्हणजे डिसेंबर २०२० नंतर,  आजपर्यंत एकट्या पॅकेज १ मध्ये अतिरिक्त २३ लाख टन पुनर्प्राप्ती भरण्याचे साहित्य वापरले गेले आहे आणि वरीलपैकी बहुतेक बेकायदेशीर गोष्टी अजूनही केल्या जात असल्याचा आरोप आहे. असे असल्यास, पॅकेज 1 मधील फसवणूकीची रक्कम रुपये ६८४ कोटीहून अधिक असून एकूणच प्रकल्पामधील ह्या बेकायदेशीरपणामुळे ही रक्कम रुपये १००० कोटींपेक्षा जास्त असेल.

हा सर्व घोटाळा पाहता या प्रकल्पाच्या तीनही टप्प्यात अशाच प्रकारे गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये त्यांना कोणाचा राजकीय पाठींबा आहे का? कुणाच्या आशीर्वादाने हा सारा प्रकार सुरु आहे? सरकारचा महसूल बुडवून हा पैसा भ्रष्टाचाराच्या मार्गाने कुठे वळवला गेलाय का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होत असून या प्रश्नांची तातडीने एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT