Kalpna Pande
Kalpna Pande 
मुख्य बातम्या मोबाईल

शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडेंचे कोरोनाने निधन

सरकारनामा ब्युरो

नाशिक : शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे शनिवारी मध्यरात्री निधन झाले. माजी महापौर विनायक पांडे यांच्या त्या वहिनी होत. शहरात कोरोनाने निधन झालेल्या सौ. पांडे या अतिशय सक्रीय व धडाडीने लोकांत जाऊन काम करणा-या नेत्या होत्या. त्यांच्या निधनाने महापालिकेत एक कार्यक्षम महिला लोकप्रतिनिधी गमावल्याची भावना आहे.  

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागन झाल्याने एका खासगी रुग्णालयावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी मध्यरात्रीनंतर एकला त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शिवसेनेसह महापालिकेला मोठा धक्का बसला आहे. लोकांशी समरस होऊन काम करणारी शिवसेनेची रणरागिनी कोरोनामुळे अशी अचानक जाते, ही बाब अनेक जुन्या-जाणत्या शिवसैनिकांना चटका लावून गेली. त्यांच्यावर अमरधाम येथे रविवारी शासकीय नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सौ. पांडे या प्रभाग क्रमांक २४ चे प्रतिनिधीत्व करत होत्या. त्या महापालिका निवडणुकीत चार वेळा निवडूण आल्या होत्या. त्यांचे पती चंद्रकांत पांडे यांनीही एकदा या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. कल्पना पांडे यांनी सिडको प्रभाग सभापती म्हणून दोन वेळा काम केले. पालिकेतील काही समित्यांवर त्यांनी काम केले. महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या पांडे यांची प्रभागातील विकास कामे आणि मतदारांशी राखलेला जनसंपर्क यावर भिस्त होती. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असलेल्या कल्पना पांडे यांचे महापालिकेतील काम अतिशय आक्रमक होते. शिवसेनेला शोभेशी अशी कामाची आक्रमक शैली असल्याने महापालिकेत त्या नेहमीच चर्चेत असत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी नंदिनी (नासर्डी) नदीतील अतिक्रमणाचा मुद्यावर आवाज उठवला होता. त्यासाठी त्यांनी स्थायी समितीच्या सभागृहात, तसेच शहर अभियंत्यांच्या कार्यालयात वारंवार आंदोलनेही केली होते. 

स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम करताना त्या नेहमीच विविध मुद्यांवर स्पष्ट भूमिका मांडत. महापालिकेच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग मिळावा, तसेच त्यांना पदोन्नती देण्यात यावी यासाठी त्यांनी स्थायी समितीसह महासभेत नेहमीच भूमिका मांडली होती. प्रभाग समितीच्या सभेतही त्या नेहमीच प्रभागातील मुद्यांवर आक्रमक भूमिका मांडत. गेल्या काही दिवसांपासून त्या कोरोना आजाराशी लढा देत होत्या. 

कोरोनाकाळातील कामही स्मरणात
नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनाकाळातील कामही लक्षवेधी ठरले होते. पहिल्या लाटेपासून आतापर्यंत त्यांनी सातत्याने कोरोना रुग्णांसाठी सेवा दिली. रुग्णांना हॉस्पिटल मिळवून देणे, औषधे मिळवून देणे, कोरोना विषयीची जनजागृती करणे यात त्या अग्रेसर होत्या. महापालिकेच्या वतीने कोरोनाकाळात वाटण्यात येणार्‍या औषधांवर त्यांनी आक्षेप घेतला होता. सर्दी, खोकल्याची औषधे दिल्याने रुग्णांची प्रकृती अधिक खालावत असल्याचा दावा करीत त्यांनी प्रशासनाचे डोळे उघडले होते.

छगन भुजबळांकडून श्रद्धांजली

शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. त्या सलग चार वेळा नगरसेविका म्हणून त्यांनी विविध लोकउपयोगी कामे केली. प्रभाग सभापती तसेच विविध समित्यांवर त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी स्वीकारली. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असलेल्या कल्पना पांडे यांच्या निधनाने सेवाभावी लोकप्रतिनिधी काळाच्या पडदयाआड गेला आहे, या शब्दांत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT