Shivsena leader Devram Lande and His opponents will also join the NCP
Shivsena leader Devram Lande and His opponents will also join the NCP  
मुख्य बातम्या मोबाईल

देवराम लांडे राष्ट्रवादीत येताना आपल्या विरोधकांनाही सोबत आणणार? 

दत्ता म्हसकर

जुन्नर : (जि. पुणे) : आदिवासी समाजाचे नेते आणि शिवसेनेचे पुणे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. ते राष्ट्रवादीत येताना आपल्या राजकीय विरोधकांना बरोबर आणण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, देवराम लांडे यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सदस्य काळू शेळकंदे, मारुती वायाळ यांना एकत्र आणण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊ देवाडे यांनी केले आहे. त्यामुळे लांडे यांच्या बरोबरच शेळकंदे आणि वायाळ यांचाही राष्ट्रवादी प्रवेश होण्याची चर्चा जुन्नर तालुक्यात रंगली आहे. (Shivsena leader Devram Lande and His opponents will also join the NCP)

दरम्यान, देवराम लांडे आणि त्यांच्या विरोधकांना एकत्र आणण्यात देवाडे यांना यश आले आहे. लांडे यांचे विरोधक काळू शेळकंदे आणि मारुती वायाळ यांनी एकत्र येत आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कुकडेश्वर मंदिरात नुकतेच हिरडा कारखाना आणि समाजाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची शपथ घेतली आहे. हे तिघेही सध्या शिवसेनेत आहेत. एकीकडे ही घडामोड घडत असताना दुसरीकडे लांडे यांचे विरोधकही सक्रीय झाले आहेत. लांडे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात शह देण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निरगुडे-पाडळी गटातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांच्या विरोधात मोर्चेबांधणीला वेग आला आहे. 


लांडे यांच्या विरोधकांनी कुकडेश्वरास अभिषेक करून समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा केली. या वेळी १५ ऑगस्टपर्यंत हिरडा कारखाना सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. या सभेत लांडे यांच्या विरोधात अनेक आरोप करण्यात आले. या निमित्ताने लांडे यांच्या विरोधात विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे.

देवराम लांडे यांनी या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतून निवडणूक लढवून विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपददेखील मिळविले होते. त्यांचा बालेकिल्ला म्हणून हा गट ओळखला जातो, त्यांच्या विरोधात शिवसेनेचे दत्ता गवारी यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ देवाडे यांनी एकमेकांच्या विरोधात असलेले लांडे, वायाळ व शेळकंदे यांना एकत्र आणल्याने भविष्यात तिघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास निरगुडे-पाडळी गटात राष्ट्रवादी काँगेसचे वर्चस्व वाढणार आहे. दरम्यान, आमदार अतुल बेनके यांनी मात्र ते शिवसेनेत असल्याचे जाहीर केले आहे, तर शिवसेनेचे नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या दृष्टीने त्यांनी शिवसेना सोडल्याची भूमिका घेत समाज माध्यमातून तिघांवर टीका सुरू केली आहे.

जुन्नर तालुक्यातील आदिवासी समाज हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानणारा असल्याने यापूर्वीच्या काळात हा गट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिला. मात्र, गेल्या निवडणुकीत लांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या गटात व गणात शिवसेनेची सत्ता आली. आगामी निवडणुकीत हा गट पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्यासाठी या तिघांचे एकत्रीकरण महत्वाचे ठरणार आहे.

श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष, माजी पंचायत समिती सदस्य काळू शेळकंदे, नॅशनल आदिवासी पिपल फेडरेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मारुती वायाळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य देवराम लांडे व जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊ देवाडे यांनी आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कुकडेश्वर मंदिरात एकत्र येत शंभू महादेवाला साक्षी ठेऊन एकत्र राहण्याची शपथ घेतली आहे. या शपथेची चर्चा होत आहे. आदिवासी समाजाचा विकास तसेच, गेली २५ वर्षांपासून प्रलंबित असणारा हिरडा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी हे सर्व एकत्र आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT