Covid Shivsena
Covid Shivsena 
मुख्य बातम्या मोबाईल

शिवसेनेचे कोविड सेंटर हे माणुसकीचे उत्तम उदाहरण !

सरकारनामा ब्युरो

नाशिक : शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संकल्पनेतून, तसेच महापालिका आणि लोकसहभागातून साकार झालेले सावतानागर येथील सर्वसुविधांनी युक्त कोविड केअर सेंटर म्हणजे माणुसकीचे उत्तम उदाहरण आहे. सर्वांनी त्याचा आदर्श घ्यावा, असे गौरवोद्‌गार कृषिमंत्री दादा भुसे यांनी काढले. 

नाशिक शहरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन गरजू रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात, तसेच यासाठी होणारी परवड थांबावी या उद्देशाने शिवसेना महानगरप्रमुख यांनी पुढाकार घेऊन सावतानगर येथील स्वा. सावरकर सभागृहात (क्रॉम्प्टन हॉल) उभारलेल्या पहिल्या टप्प्यातील ६५ खाटा असलेल्या कोविड सेंटरचे उद्‌घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. वीर सावरकर सभागृहात साकारलेल्या अत्याधुनिक सुविधायुक्त अशा सुसज्ज कोरोना सेंटरमध्ये ४५ खाटा ऑक्सिजनयुक्त असतील. तसेच, रायगड चौकातील बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी या महापालिकेच्या शाळेत १०० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. त्याचे काम प्रगतिपथावर आहे, असे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. 

सावतानागर येथील रुग्णांच्या सेवेसाठी निष्णात डॉक्टरांचा फौजफाटा नेमला आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणात कर्मचारी व स्वयंसेवक असणार आहेत. शहरातील कोरोना संसर्गाचा वाढता आलेख आणि रोजच रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून सुरु झालेले हे पहिले कोविड रुग्णालय आहे. त्यामुळे सिडको परिसरातील रुग्णांना दिलासा मिळेल. कोरोना नियंत्रणात यावा यासाठी देखील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक तसेच कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी लवकरच नागिरकांसाठी प्रबोधन व जनजागृती मोहिम राबविली जाईल, असे महानगरप्रमुख बडगुजर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महापालिका आयुक्त कैलास जाधव, माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, मनपा गटनेते विलास शिंदे, बळिराम ठाकरे, युवासेना जिल्हा अधिकारी राहुल ताजनपुरे, नगरसेवक श्यामकुमार साबळे, रत्नमाला राणे, हर्षदा बडगुजर, किरण गामणेबाळा दराडे आदी उपस्थित होते. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT